आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; रविवारी होणार ‘रिव्हर सायक्लोथॉन’

44

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 28) सकाळी 6 वाजता, भोसरीतील गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी अध्यक्ष संतोष लोंढे, अविरत श्रमदान व सायकल मित्रचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लांढे, संतोष गाढवे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात येते. रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्पयात होणार आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 किमी मार्यादा आहे. कै. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य – संतनगर – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग असेल. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा असून, कै. अंकुशराव लांडगे सभागृह – जय गणेश साम्राज्य क्रांती चौक – जय गणेश साम्राज्य – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. तसेच 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉन साठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह – स्पाईन रोड – क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर – कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल मोफत देण्यात येणार आहेत.

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या या सायक्लोथॉनमध्ये पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी गणेश पानसरे (968991535), बापु शिंदे (9552187778) यांच्याशी संपर्क साधवा. तसेच, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://forms.gle/AHimsjLqwscNoyhF6 या लिंकला भेट द्यावी, असेही आवाहन अविरत श्रमदानचे संस्थापक सदस्य दिगंबर जोशी यांनी केले आहे.

अविरत श्रमदानच्या सदस्या नीलम गव्हाले म्हणाल्या की, आम्ही दत्त गडावर फिरायला जात असतो तिथे आमची ओळख अविरत टीम सोबत झाली. त्यांचं पर्यावरण संवर्धनाचे काम बघून आम्ही आपोआपच जोडले गेलो. अविरत म्हणजे फक्त झाडे लावणारी संघटना नसून, तिची उत्तम जोपासना करतो. त्यामुळे ती झाडे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असे वाटते. यामध्ये तरुणांसोबतच, लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिक देखिल मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात.

सायकल मित्र संस्थेच्या सदस्या जयश्री जाधव म्हणाल्या की, सायकल मित्र पुणे यांच्यामुळे महिला असूनही सायकलिंगचा छंद सुरक्षित जोपासला जातोय. तसेच, पंढरपूर वारी, भीमाशंकर वारी, अष्टविनायक वारी करताना सुद्धा आम्हाला सर्वांचा आधार वाटतो. सायकल मित्र ही फक्त सायकलिंग करणारी संघटना नसून, गरजूंना सायकल वाटप करणे, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे, पर्यावरण जनजागृतीसाठी व नदीच्या स्वच्छतेसाठीच ही रिव्हर सायक्लोथॉन घेतली जाते. तसेच, समाजासाठी काही करावा हे आम्हा तरुणांना नेहमी वाटत असते आणि आविरत श्रमदानच्या रूपाने आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि युवा शक्तीचा वापर योग्य कामासाठी करत आहोत, असे युवा महाराष्ट्र ग्रुपच्या प्रतिनिधींनी सांगितले. एमआयटी कॉलेजच्या एनएसएस टीमच्या सदस्यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये समाजपयोगी काम करत असताना अविरत श्रमदान सोबत जोडले गेलो आज आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढीस लागले आहेत त्याचा उपयोग आम्हाला आमच्या करिअर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येईल.

WhatsAppShare