आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर हल्ला प्रकरणातील तानाजी पवार कोण ?

1014

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज (बुधवार) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान, गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. बनसोडे यांच्यावर हल्ला करणारा तानाजी पवार आता चर्चेत आला आहे.

तानाजी पवार हा माजी सैनिक असून तो महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या अँथनी वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत प्रकल्प हेड म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजले. तानाजी पवार याने गोळीबार का केला याबाबत आता विविध तर्कवतर्क सुरू आहेत. पवार हा ज्या अँथनी कंपनीत सेवेत आहे त्या कंपनीच्या चार-पाच कर्मचाऱ्यांना आमदार बनसोडे यांच्या समर्थकांनी मंगळवारी बेदम मारहाण केली होती. त्यातील दोघांचे हात फॅक्चर आहेत आणि दोघांना गंभीर इजा झाली असून टाके पडले असल्याचे समजते. या मारहाण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करू नये यासाठी बनसोडे यांनी प्रयत्न केले होते, अशी चर्चा आहे. प्रकरण वाढवू नये म्हणून तानाजी पवार याला आज आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तिथे बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवार याला बेदम मारहाण केली. पवार याच्याकडे पिस्तूल असल्याने त्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, अशी माहिती हाती आली आहे.

मारहाण झाली त्यावेळी आमदार बनसोडे हे त्यांच्या कार्यालयामध्ये होते. हल्लेखोरांनी गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर तात्काळ गोळीबार केला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून 3 राऊंड फायर केले. सुदैवाने बनसोडे एकदम सुखरूप आहेत. कार्यालयाच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी गोळीबार करणार्‍या संशयितास चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून पोलिसांना घटनास्थळावरून 2 पुंगळया, 10 ते 12 राऊंड, पिस्टल, 2 मॅझीन मिळाल्या आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, नेमकी अँथनी कंपनीच्या कामगारांना आमदार बनसोडे यांच्या समर्थाकांनी मारहाण का केली तसेच तानाजी पवार यांनी गोळाबार का केला याबाबतचे नेमके गूढ अद्याप उकललेले नाही.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन जवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना आवाहन केले आहे. आज जो प्रकार घडला आहे त्यामध्ये मला किंवा अन्य कोणालाही काहीही झालेले नसून आपण सुरक्षित आहोत. तरी कार्यकर्त्यांनी संतप्त होऊ नये, कुठेही गर्दी करू नये. पुढील तपास पोलिस करत असून ते सोक्षमोक्ष करतील आपण सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

मी त्या कंत्राटदाराला काळा की गोरा ओळखत नाही. दोघांना कामावर घेण्यासाठी मी फक्त त्या कंपनीच्या सुपरवायझर म्हणून तानाजी पवारला बोललो होतो. त्यानंतर माझ्याशी बोलताना तानाजी पवार याने अरेरावीची भाषा केली. त्याच्या मालकालाही मी हे सर्व सांगितले. तानाजी पवार आज दुपारी माझ्या ऑफिसला आला होता. तो आला आणि त्याच्या बरोबर दोन साथीदार घेऊन आला होता. माझ्याशी बोलताना त्याने वाद घातला. मग माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला शिवीगाळ केली. त्याने फायरिंग केली तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला जागेवर पाडले. त्याने थेट माझ्या दिशेने फायरिंग केली होती. खरे तर, त्या कचरा कंत्राटदाराचा माझा काहीही संबंध नाही. तो काळा की गोरा हेसुध्दा मला माहित नाही. आता पोलिस तपास करत आहेत. घटनेनंतर पोलिस आयुक्तांचा फोन आला, उपायुक्त भेटीसाठी आले, असे आमदार बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

WhatsAppShare