पत्रकार वारिसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार कोण ?

0
360

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – आंगणेवाडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती. त्यात त्यांनी रिफायनरीबाबत जाहीर धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या तरूण पत्रकाराची हत्या झाल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. जोपर्यंत शशिकांत वारीसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याचे राऊत म्हणाले. या हत्येचा संबंध कोकणात मागील 25 वर्षात झालेल्या हत्येशी जोडत असल्याचे राऊत म्हणाले. सरकार बदलताच कोकणात हत्येचं सत्र सुरु झाल्याचे राऊत म्हणाले.

कोकणात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक आणि आता वारीसे यांची हत्या झाल्याचे संजय राऊत म्हणाले. आरोपींनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या. कुणाच्या हत्या केल्या हेदेखील शोधलं पाहिजे असे राऊत म्हणाले. रिफायनरीजवळ जमिनी घेणाऱ्यांची यादी आपण जाहीर करणार असल्याचा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. वारीसे काही नेत्यांच्या डोळ्यांत खुपत होते. वारीसे यांना आधीही धमक्या आल्या होत्या असे राऊत यांनी सांगितलं. वारीसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीमागचे खरे सूत्रधार कोण? असा सवालही राऊतांनी केला आहे. याबाबत मी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचे राऊत म्हणाले.

मलापण दोनदा धमकी आली, पण वारीसे यांचा मुद्दा मांडणारचं

रिफानरीच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून शशिकांत वारीसे यांची हत्या झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या आसपास जमीनी विकत घेतल्या आहेत. हे कोण व्यापारी आहेत याची यादीच जाहीर करणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आमचे स्थानिक आमदार वारसे कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. माझी मागणी आहे की वारीसे कुटुंबियांना तातडीनं 50 लाखांची मदत द्यावी. हा सरकारनं केलेला खून असल्याचा आरोपही राऊतांनी केला. मला पण सकाळपासून दोनदा धमकी आली आहे की वारीसेंचा मुद्दा उचलाल तर तुमचाही वारीसे करू. पण एका पत्रकाराची हत्या ही एका सैनिकाची हत्या आहे. त्यामुळं मी हा मुद्दा मांडणारच, मी कुणाला भीत नाही.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या हत्या

रिफायनरीच्या आसपास ज्यांनी कवडीमोल किंमतीत जमिनी घेतल्या त्यांची माहिती देण्यास वारीसे यांनी सुरुवात केली होती. रिफायनरी समर्थक आणि सरकारमधील काही लोक, रत्नागिरीतील काही राजकारणी यांचे जमिनी घेण्याच्या प्रकरणात साटलोट आहे. परप्रांतियाबरोबर अब्जावधी रुपयांचे व्यवहार झाले, त्यासंदर्भात वारीसे यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळं ते राजकाराण्यांच्या डोळ्यात खुपत होते असे राऊत म्हणाले. सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याचे राऊत म्हणाले. हत्या करणाऱ्या आरोपीमागचे खरे सूत्रधार कोण हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहित असल्याचे राऊत म्हणाले.