Pune

हिंदू जनजागृती समितीचे यशस्वी उपक्रम ! महिलांसाठी आरोग्य शिबीर तर वसतिगृहातील मुलांसाठी अन्नदान योजना

By PCB Author

January 28, 2023

पुणे, दि. २८ (पीसीबी) – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून १६ जानेवारी या दिवशी पुष्पम बचत गट, समता नगर, वारजे पुणे येथील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी महिलांच्या शारीरिक तपासणी सोबत ब्लडप्रेशरची नोंद घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व औषधे लिहून दिली तसेच महिलांसाठी ‘चाळीशी नंतर होणारे आजार आणि घ्यायची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधानही केले.

तसेच राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे २० जानेवारी या दिवशी वनवासी वसतिगृहातील गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्नदान उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी वसतीगृहाचे अधीक्षक श्री. अमोल डमरे यांचे सहकार्य लाभले. तसेच जीवन ज्योत वसतिगृह सुरज नगर, डावी भुसारी कॉलनी पौड रोड, पुणे येथेही वसतिगृहातील गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्नदान उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी वसतीगृहाच्या अध्यक्षा मनीषा जोशी यांचे सहकार्य लाभले.

२४ जानेवारी या दिवशी सोमवार पेठ येथील काळाराम मंदिरात हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सौ प्रज्ञा सिडाम यांनी मधुमेह या विषयावर व्याख्यान दिले. महिलांनीही आपल्या शंका विचारून त्यांचे निराकरण करून घेतले तसेच उपयुक्त मार्गदर्शन केल्याविषयी समितीचे आभार मानले. या सर्व उपक्रमांचा लाभ ८७ हून अधिक जणांनी घेतला.