अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उद्यापासून ‘सृजनदीप’ व्याख्यानमाला

0
233

देहू, दि.३० (पीसीबी) : – श्री क्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन दिवसीय ‘सृजनदीप’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, विचारवंत इंद्रजीत देशमुख ‘सुजाण पालकत्व’ या विषयांवर व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफणार असून सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सुषमा भोसले या अध्यक्ष असतील. बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक, समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी हे ‘निराधारांचे होऊया आधार’ या विषयातून मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी जल व्यवस्थापनातील तज्ञ मार्गदर्शक अरुण जोशी असतील.

‘माझा महाराष्ट्र’ या विषयावर’ दै. लोकमतचे संपादक डॉ. संजय आवटे हे गुरुवार 2 फेब्रुवारी 2023 रोजी विचारमंथन करणार असून अध्यक्षस्थानी सनदी लेखापाल माहेश्वर मराठे असतील. सृजनदीप व्याख्यानमालेच्या विचारअमृताने विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज यांचे प्रबोधन होऊन एक सुजाण पालक घडावा, येथील कोवळ्या मनांना संस्कारचे खतपाणी मिळून एक चारित्रसंपन्न सुंदर माणूस घडावा, विचारांच्या दीपोत्सवाने हृदय मंदिरातील गाभारा उजळून निघावा या भावनेतून ही ‘सृजनदीप’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. सर्व पालकांनी व श्रीक्षेत्र देहू परीसारतील सर्व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद व अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले.