शिवसेनेची मान्यता व चिन्ह गेले, पुढे काय ???

0
433

मुंबई दि. १८ (पीसीबी) – निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ६० वर्षांपूर्वी मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचे अस्तित्व संपले. खरे तर, कट्टर शिवसैनिकांच्या आयुष्यातील हा तसा अगदी काळाकुट्ट दिवस. ठाकरे आणि शिवसेना हे तसे एक अतूट समिकरण, पण सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या हातचे बाहुले बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी त्याला सुरुंग लावला. भाजपला तसे विरोधक नकोच आहेत आणि छोटे पक्षही संपवायचे आहेत. शिवसेना ही त्यात पहिली सर्वात मोठी शिकार.

ठाकरे यांचे ४० आमदार आणि १३ खासदार फुटले याचे कोणालाही विशेष वाईट वाटले नाही, पण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे यांनी हिसकावून घेतले त्याची सल आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ने हाकारे द्यायचे आणि शिकार टप्प्यात आली की भाजप नेत्यांनी बार टाकायचा. अगदी सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळ्याच स्वायत्त यंत्रणांचा लोकशाहित कसा खुळखुळा झाला ते लोक पाहतात. भाजपचे सर्वेसर्वा मोदी-शाह यांना जाब विचारणारा नकोय, तर हुजरे पाहिजेत.

दहा वर्षांपूर्वीच शिवसेना, अकालीदल, तृनमूल कॉँग्रेस, तेलगू देसम्, एआयएडिमके, बिजू जनतादल असे एनडीए मधील एक एक करत सगळेच संपवायचे ठरवले. २० वर्षांत या सर्व प्रादेशिक पक्षांची शिडी करून दोन जागांवरून भाजप ४०३ वर गेला. आता शिडी फेकून दिली. गरज सरो वैद्य मरो ही भाजपची व्यापर निती. भाजपला स्वतःच्या मतात भागीदार नको म्हणून त्यांनी घरभेदी शिंदे यांना गळाला लावले आणि शिवसेनेचा काटा काढला. भाजपचे काम फत्ते झाले.

आता नैसर्गीक न्यायाने उद्या शिंदेंचेसुध्दा तेच होणार जे आज ठाकरेंच्या शिवसेनेचे झाले. प्रश्न उध्दव ठाकरे आणि गावोगावी गल्लीबोळात शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्यांचे पुढे काय होणार ?, मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हापरिषद, नगरपालिकांच्या निवडणुका आता लगेचच जाहीर होतील त्यांचे काय ? शिवसेनेचा पक्षनिधी कोणाच्या तिजोरीत जाणार ? शिवसेनेचे सेनाभवन आणि गावोगावच्या शिवसेना शाखांची मालकी कोणाची राहणार ? शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्यांचे काय ?

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निकाल दिला. हे दोन्ही आता शिंदे गटाकडे जाणार आहे. शिवसेनेची मान्यता गेली आणि परंपरागत चिन्हसुध्दा गेले. आयोगाने स्पष्ट केले आहे की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकिपर्यंतच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मशाल हे चिन्ह वापरता येईल असे बजावले. याचाच दुसरा अर्थ २ मार्चला निवडणूक निकाल लागल्यानंतर आताचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मशाल हे चिन्ह सुध्दा संपणार आहे.

म्हणजेच आता उध्दव ठाकरे यांना दुसरा नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल आणि चिन्हसुध्दा दुसरे घ्यावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी असा काही सूड उगवला की, शिवसेनेचे वडाचे झाड अगदी मुळासकट उखडून टाकले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति आदर दाखवत त्यांनीच स्थापन केलेली आणि भाजपला सारखे आव्हान देणारी शिवसेना त्यांनी संपवली. शब्द खरा केला. मूळ शिवसेनेचे अस्तित्वच संपवले. एक मुरब्बी राजकारणी कसा असतो त्याचा साक्षात्कार दिला.

आता ठाकरेंचे नेते एकनाथ शिंदे –

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे यांची शिवसेना शिंदेंच्या मालकिची झाली. संजय राऊत अथवा स्वतः ठाकरे यांनी कितीही आकांडतांडव केला तरी नियम, कायद्यानुसार शिवसेनेचे सर्वेसर्वा आता एकनाथ शिंदे झालेत हे कटू सत्य आहे. त्यामुळे पूर्वीचे ४० आमदार आणि १३ खासदारांबरोबच मूळ शिवसेनेत उरलेले उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदार आणि ५ खासदारांचे नेते आता एकनाथ शिंदे आहेत. रोज भाजप आणि शिंदे यांच्यावर आग ओकणाऱ्या राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांचेही नेते आता शिंदेच असणार आहेत.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह अनिल परब आणि परिषदेतील आमदाराचे नेते शिंदेच आहेत. आता यापुढे या सर्व आमदार-खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचेच पालन करावे लागणार. त्यांनी काढलेला व्हीप पाळावा लागणार अन्यथा त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाईसुध्दा होऊ शकते. घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी म्हण आता इथे बरोबर उलटी झाली आहे. शिंदे यांच्यामुळे घराचे वासे फिरले आणि नंतर आख्खे घर फिरले.

शिवसेनेचा पक्षनिधी, कार्यालयांवर मालकी शिंदेंची –

संपूर्ण शिवसेनाच आता शिंदे यांच्या मालकिची झाली आहे. यापुढे शिल्लक निधी आणि कार्यालयांची मालकी कोणीची हा वाद आहे. कदाचित एकनाथ शिंदे हे आता दादरच्या शिवसेनाभवनावरसुध्दा मालकी सांगतील, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तसे शक्य वाटत नाही कारण सेनाभवनासह राज्यातील अनेक शिवसेना कार्यालये व शिवसेना शाखांची मालकी ही स्वतंत्रपणे जय भवानी प्रतिष्ठानकडे आहे. भारतीय कामगार सेना, विद्यार्थी संघटना, स्थानिय लोकाधिकार समिती अशा विविध शिवसेना अंगिकृत संस्थासुध्दा स्वतंत्र असल्याने त्यांची मालकी शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेनेला मिळणाऱ्या पक्षनिधीवर संपूर्ण मालकी शिंदे यांचीच असेल.

गतवर्षी भाजपला तब्बल ३ हजार ९०० कोटी तर काँग्रेसला अवघे एक हजार कोटी रुपये देणगी मिळाली होती. त्या तुलनेत शिवसेना अत्यंत किरकोल आहे, पण जी काही देणगी मिळाली ती बँकेतील शिल्लक आता शिंदेंची झाली आहे. अद्याप पर्यंत जयभवानी प्रतिष्ठानच्या नावावर केलेली नाहीत अशी शिवसेनेच्या नावाने असलेली सर्व कार्यालयेसुध्दा शिंदे यांच्याकडेच जाणार आहेत. आता शिवसेनेचे दोन गट तांत्रिकदृष्ट्यासुध्दा राहिलेले नाहीत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाची मालकी ही स्वतंत्रपणे प्रबोधन प्रतिष्ठानकडे असल्याने तिथे धक्का लागण्याची शक्यता नाही.

शिवसैनिक ही ओळख कशी पुसणार –

राज्यातील सर्व जातीधर्माचे फाटके कार्यकर्ते ही खरी शिवसेनेची ओळख. जात, भाषा, धर्माच्या राजकारणात कधीच जात विचारली जात नाही म्हणून ब्राम्हणेतर बहुजन समाज आणि विशेषतः ओबीसी समाज हा शिवसेनेचे सर्वात मोठा आधारस्तंभ. १९९५ मध्ये युतीची सत्ता आली होती. त्यावेळी काँग्रेसची सत्ता का गेली याचे आत्मपरिक्षण करण्यासाठी पुण्यात शिवदर्शन सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी शिवसेना सत्तेत येण्यामागचे एक निरिक्षण सांगितले होते. बौध्य, नवबौध्य सोडून मातंग, चर्मकार, ढोर समाजाचे तब्बल ११ आमदार शिवसेनेचे होते, असे खुद्द पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते.

वडापाववाला, भाजी विक्रेता असे रस्त्यावरचे कार्यकर्ते बाळासाहेबांनी आमदार केले. या सर्वांचा आधारस्तंभ होता शिवसैनिक. ठाकरे यांच्या आदेशावर तुटून पडणारे शिवसैनिक. शिवसेनेप्रमुखांचा फोटो देवघरात ठेवून पुजणारे शिवसैनिक. कुठेही अन्याय, अत्याचार दिसला की दे दणादण करणारे शिवसैनिक. सत्तेची मस्ती चढलेल्या राजकारण्यांना, भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शब्दांचा नव्हे तर खरोखरचा लत्ताप्रहार करणारे शिवसैनिक. साहेबांसाठी रक्त सांडणारे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे शिवसैनिक. गावोगावी या शिवसैनिकांची जरब होती.

मुंबईची शिवसेना छगन भुजबळ यांनी गावोगावी, वाडितोडीवर नेली. त्याच ताकदिचा वापर करत भाजपने आपले जाळे विणले आणि पाय मजबूत केले. आता शिवसेना शिंदेंच्या मालकिची झाल्यावर ठाकरे यांचे कुंकू शिवसैनिक पुसणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. शिवसैनिकांचे चिलखत ही शिवसेनेची शान होती आता त्या दिनदुबळ्या शिवसैनिकांचा वाली कोण. ठाकरे यांच्या जीवावर मोठे झालेल्या शिंदे यांना आता बाळासाहेबांच्या जागेवर पाहणार का हा प्रश्न आहे.

रक्ताचे पाणी केलेल्या शिवसैनिकांची अवस्था घर का ना घाटका अशी झाली आहे. मुळात शिवसैनिक ही त्यांची ओळखसुध्दा कालच्या घडामोडीत पुसली गेली आहे. उध्दव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुदत २३ जानेवारी २०२३ ला संपली आहे. ठाकरेंची मुदत संपल्याने कायदेशीर लोकशाही मार्गाने आता नवीन अध्यक्ष निवडावा लागणार आणि तिथे एकनाथ शिंदे यांचेच नाव येणार. गावोगावचे शिवसेना शाखाप्रमुखसुध्दा शिंदेंचे असणार, मग ठाकरेंचे कुंकू लावलेले शिवसैनिक कुठे जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

नवीन पक्षाला मान्यतेसाठी –

आता ठाकरे यांनी नवीन पक्ष नोंदवावा लागेल. भाजपची गेम यशस्वी झाल्याने आता मुंबई महापालिका ताब्यात घेणे त्यांच्यासाठी सोयिचे आहे. कदाचित याच घडामोडींचा फायदा घेऊन मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका, जिल्हापरिषदा, नगरपालिकांच्या निवडणुकाही भाजपच्या आदेशावर निवडणूक आयोग जाहीर करेल. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि समजा १६ किंवा आणखी २३ आमदार अपात्र ठरलेच तर कदाचित सरकार बरखास्त होईल आणि मध्यावधी निवडणुका होतील. समजा शिंदेंसह ४० आमदार अपात्र झालेच तर राष्ट्रवादी काँग्रेस गुडघ्याला बाशिंग बांधून उभी आहेच.

खुद्द अजित पवार यांनीच म्हटले आहे की, सरकार बरखास्त झाले तर दुसऱा पर्याय असू शकतो, निवडणुकांची शक्यता नाही. समजा निवडणुका लागल्याच तर ठाकरे यांच्या नवीन नोंदणीकृत पक्षाला मान्यता मिळावी म्हणून किमान १३ आमदार किंवा पाच टक्के मते मिळवावी लागतील. गावखेड्यातत पुन्हा नवे चिन्ह पोहचवावे लागेल आणि स्थानिक स्वराज्या संस्थांवर अस्तित्व दाखवावे लागेल. म्हणजेच पुन्हा शुन्यातून सुरवात करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय जनतेला पसंत पडला नाही त्यामुळे सहानुभूती ठाकरे यांना आहे. अशात पुन्हा ठाकरेंचा पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात या सर्व घडामोडींचा भाजपला तोटा संभवतो, पण शिवसेनेला पर्याय आणि भाजपला विरोध म्हणून मोठा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. तोवर जय महाराष्ट्र म्हणायला हरकत नसावी.