नाशिक, दि. २३ (पीसीबी) : जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिकमधील साधू महंत आक्रमक झाले असून ते रामकुंड येथे दुपारी एकत्र येणार असल्याची माहिती आहे. अंद्धश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्माविरोधात आवाज उठवत असल्याचा या साधू महंतांचा आरोप आहे.
दरम्यान, नाशिक येथील रामकुंड परिसरात दुपारी साधू महंत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी सर्व साधू महंत, नागा संन्यासी, हिंदुत्ववादी संघटना, पिरोहित संघ आणि धर्मशास्त्र अभ्यासक हे सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाला एक निवेदन देणार आहेत. त्या माध्यमातून ते राज्य सरकारला जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
शासनाने लागू केलेल्या या कायद्याच्या उद्देश भरकटला असल्याचा आरोप नाशिक येथील महंतांनी केला आहे. फक्त हिंदूंना आणि हिंदू धर्मगुरूंना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सगळ्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असून शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.