ज्या शक्तीने शिवसेनेचे नाव, चिन्ह हिसकावले त्यांना जनता धडा शिकवेल – शरद पवार

0
325

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी देशात घडले नव्हते. पण, शिवसेनेबाबत जे घडले. त्याच्या पाठीमागे कुठली तरी मोठी शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, हे ज्यांनी केले आहे. त्यांना लोक धडा शिकवतील, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पिंपळेसौदागर येथे बोलताना पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर करुन एखादा राजकीय पक्ष, त्याची खून (चिन्ह) या सगळ्याच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे या देशात कधी घडले नव्हते. शिवसेनेचे नाव, चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय नियमांना धरुन झाला नाही. निर्णय कोण घेतेय याची आम्हाला शंका येत आहे. आयोग निर्णय घेतोय की आयोगाला कोणाचे मार्गदर्शन आहे.

अनेक पक्षामध्ये अंतर पडले. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे दोन पक्ष झाले होते. काँग्रेस एसचा मी अध्यक्ष होतो. काँग्रेस आयच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. त्यावेळेला काँग्रेस नाव वापरण्याचा मला अधिकार होता. नाव काढून घेतले नाही. त्याला निवडणूक आयोगाने कधी अडविले नाही. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्ये असे आहे की पक्षाचे नाव, खून हे सगळे दुस-याला दिले. असा निर्णय आजपर्यंत या देशाच्या इतिहासात कधी घडला नाही.

पण, मला लोकांचा अनुभव आहे. ज्यावेळेला सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला, नेतृत्वाला नाऊउमेद करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला लोक त्या पक्षाच्या मागे उभा राहतात. मला 100 टक्के खात्री आहे. लोकांशी बोलताना असे दिसते की नेते शिवसेना सोडून गेले. पण, कट्टर शिवसैनिक 100 टक्के उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. हे ठिकठिकाणी दिसते. त्याची प्रचिती आगामी काळत येणा-या निवडणुकीत कळेल, असेही पवार म्हणाले. पक्षात फुटी झाल्या. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा फुटी झाल्या. पण, चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी घडले नव्हते.