MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुडन्यूज’! डब्ल्यूएफएमई कडून एनएमसीला १० वर्षांसाठी मान्यता

0
199

पिंपरी दि. २७ (पीसीबी) – केंद्रीय आरोग्य मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला (NMC) पुढील १० वर्षांसाठी जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघ (WFME) कडून मान्यता मिळाली आहे. एनएमसीच्या स्थापनेपासून चार वर्षांत जागतिक स्तरावर मिळालेल्या या मान्यतेचा देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना (Medical Students) तसेच वैद्यकीय संस्थांना (Medical Institutions) मोठा फायदा होणार आहे. या संदर्भात एनएमसीचे मीडिया डिविजन प्रमुख आणि एथिक्स मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्डाचे सदस्य डॉ. योगेंद्र मलिक यांनीही एनबीटीशी संवाद साधला. ते म्हणाले की, NMC ने वैद्यकीय शिक्षणात उच्च दर्जा प्रस्थापित केला असून, जागतिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते बदल केले आहेत. भारताचे वैद्यकीय शिक्षण आणि व्यवस्थेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या मान्यतेचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

एनएमसीचे मीडिया डिविजन प्रमुख आणि एथिक्स मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्डाचे सदस्य डॉ. योगेंद्र मलिक यांच्या मते, आता भारतीय विद्यार्थी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन आपले करिअर करू शकतात आणि इतर देशांतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. शिवाय, आता अनेक देशांशी सामंजस्य करारही केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याचेही मलिक म्हणाले. त्यामुळेच एमबीबीएस आणि पीजी स्तरावरही जागांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रातही अनेक पराक्रम गाजवले आहेत. कोविडची लस असो किंवा इतर देशांना औषधांचा पुरवठा असो, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून भारताने आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. ते म्हणाले की, ही प्रतिष्ठेची मान्यता म्हणजे वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च दर्जासाठी एनएमसीच्या बांधिलकीचा दाखला आहे.

या निर्णयानंतर, भारतातील सर्व ७०६ विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांना WFME कडून मान्यता मिळेल आणि येत्या १० वर्षांत स्थापन होणार्‍या नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनाही WFME कडून आपोआप मान्यता मिळेल. ही मान्यता भारतातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास अधिक चालना देईल. हे पाऊल एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पीजी करण्यासाठी आणि इतर देशांमध्ये सराव करण्यास मदत करेल. तसेच, आता भारतीय वैद्यकीय महाविद्यालये आणि व्यावसायिकांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इत्यादी देशांतूनही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे.