प्रबोधन वृत्तसेवाप्रबोधन वृत्तसेवा
मुंबई, दि. ८ (पीसीबी) – ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा ट्विटद्वारे दिली आहे. यापूर्वी 2008 साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे.
समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपण करण्यासाठी दिवंगत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखलं जातं. श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं, तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य. “श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून या कार्याची सुरुवात केली होती.
श्रीबैठकीशिवाय अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबियांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. यासोबतच आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. श्रीसदस्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्य करत असतात आणि समाज प्रबोधन करत असतात.
सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी यांच्यारुपाने धर्माधिकारी कुटुंबियांची तिसरी पिढीही तेवढ्याच तळमळीने याच समाजकार्यात सक्रीय आहेत. यापूर्वी 2014 मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने यांच्याकडून विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. 2017 मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.