भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं, राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना

0
273

राजस्थान, दि. २८ (पीसीबी) : राजस्थानमधील भरतपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील पिंगोर रेल्वे स्टेशनजवळ भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. क्रॅशमध्ये विमानाचे काही भाग वेगळे झाले आहेत तसेच विमानाने पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार या फायटर जेटने आग्र्याहून उड्डाण केलं होतं. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, एक चार्टर्ड एअरक्राफ्ट भरतपूरजवळ कोसळलं आहे. पोलीस आणि प्रशासकीय टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. हवाई दल सध्या या अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल अमिताभ शर्मा यांनी सांगितलं की, अपघाताची माहिती आम्हाला मिळाली आहे. नेमकं कोणतं विमान दुर्घटनाग्रस्त झालंय, याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथल्या लोकांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हे विमान गावाच्या बाहेर शेतामध्ये कोसळलं. विमान कोसळल्याच्या आवाजाने गावातले लोक घाबरले. गावातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावाच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी विमानाचे भाग विखुरले आहेत.

पायलटचा शोध सुरू

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी सांगितलं की, विमान पडलेल्या ठिकाणी कुठेही विमानाचा पायलट दिसला नाही. असं म्हटलं जात आहे. दुर्घटनेपूर्वी पायलट सुरक्षितपणे विमानातून बाहेर पडला असावा.