बेंगळुरू, दि. 6 (पीसीबी)
एचएमपीव्ही म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची भारतात दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडयावर दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) नियमित तपासणीदरम्यान ही प्रकरणं आढळली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ताप किंवा इतर संसर्गाच्या तसंच श्वसनासंबंधी आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची अचानक वाढ दिसून येत नसल्याचंही ICMR नं स्पष्ट केलं आहे.
कर्नाटकात एचएमपीव्हीची दोन प्रकरणं आढळल्यामुळं आता भारतासह जगातील अनेक देशांत याचा संसर्ग असलेले रुग्ण आढळत असल्याचं समोर येत आहे. लागण झालेले दोन्ही चिमुकले आहेत. कर्नाटकात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन्ही रुग्ण ही एका वर्षापेक्षा कमी वय असलेली लहान बाळं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तीन महिन्यांच्या एका नवजात चिमुकलीला ब्रोंकोन्यूमोनिया झाल्यानं तिला बेंगळुरूतील रुग्णायात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता तिला सुटी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका आठ महिन्यांच्या मुलालाही याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चिमुकल्यालाही ब्रोंकोन्यूमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्याला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
या दोन लहान बाळापैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांमधून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवून असून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देत आहे. गेल्या काही काळात देशभरात वैद्यकीय सेवेचा जो आढावा घेण्यात आला, त्यात श्वसनासंबंधीच्या एखाद्या आजाराचा उद्रेक झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं स्पष्ट झालं असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने जारी केले दिशानिर्देश खाली देत आहोत.
महाराष्ट्रात अद्याप एचएमपीव्ही या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारीसाठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केले आहेत.
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HPMV) हा श्वसनाच्या तीव्र संसर्गाचं प्रमुख कारण आहे. नेदरलँड्समधील शस्त्रज्ञांनी 2001 मध्ये याची ओळख पटवली होती. हा हंगामी रोग असून त्यामुळं श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो, असं DGHS आणि Director, NCDC, MoH&FW, GOI यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत.
काय करावे –
- खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून ठेवा.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेसह हवा पुरेशी खेळती राहिल अशा वातावरणाची शिफारस केली आहे.
काय करू नये –
- हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क साधा
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे टाळा