पुणे, दि. ११ (पीसीबी) – शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. शिवाजीराव बँक भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती.
ठेवीदारांची ७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. काळा पैसे हस्तांतरण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. भोसले यांनी ठेवीदारांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली होती. बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळविले होते, असे ईडीकडून कळविण्यात आले आहे.
            
		











































