अपयशाने खचू नका, संकटांना सामोरे जा; सिने अभिनेते अनुपम खेर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

0
199

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – यश-अपयश, उतार-चढाव हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे अपयशाने खचू नका, दुःख नैराश्य बाजूला सारा, अपयशावर मात करा. अपेक्षांचे ओझे वाहू नका, प्राणिकपणे काम करा. यश तुम्हाला गवसणी घालेल, असे मार्गदर्शन सिने अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना केले.

पिंपरीतील डॉ.डी. वाय. पाटील बी स्कुलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा शनिवारी (दि.11) उत्साहात पार पडला. सिने अभिनेते अनुपम खेर आणि सौरभराज जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ.डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कुलगुरू डॉ. एम.जे.पवार, डॉ.डी. वाय. पाटील बी स्कुलचे संचालक डॉ. अमोल गावंडे, सोहेल काझी आणि पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बीज रोपन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

अनुपम खेर म्हणाले, पदवी घेवून तुम्ही स्पर्धेच्या युगात दाखल होणार आहात. यापुढील काळात तुम्हाला अडचणी, संकटांना सामोरे जावे लागणार आहे. क्षणा क्षणाला, पदोपदी आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता हा यश-अपयशाचा मापदंड नव्हे. हे कायम लक्षात ठेवा. मला आयुष्यात कधीही 38 टक्यांपेक्षा अधिकचे गुण मिळाले नाहीत. तरी पण मी आज प्रमुख पाहुणा म्हणून तुमच्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित आहे.

गरिबीची लाज बाळगू नका, माणूस जेव्हा गरीब असतो. तेवढा सुखी असतो. मी अतिशय गरीब कुटुंबातून आलो आहे. एका छोट्या घरात आम्ही 14 जण राहत होतो. माझ्या आजोबांनी गरिबीची भीती घालवली. तर, वडिलांनी अपयशाची भीती काढून टाकली. थकलो, हरलो असे कधीच म्हणू नका, रस्ता हा गुळगुळीत नसावा. गतिरोधक असावेत. स्वतःला कधीच लहान समजू नका, आयुष्यात मोठे विचार ठेवा. आई-वडिलांपेक्षा कोणच मोठा हिरो नाही. यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. ते मोठे सल्लागार आहेत. त्यांना घरातील फर्निचर सारखे ठेवू नका, साचेबद्धपणा येवू देवू नका, नेहमी आई-वडील, देशाचा विचार करावा. देश, सैनिक, प्राध्यापक आहेत तर आपण आहोत, असेही अभिनेते खेर म्हणाले.

अभिनेता सौरभराज जैन म्हणाला, कर्म करत रहा, फळाची इच्छा ठेवू नका, कर्म करत राहिल्यास फळ मिळत राहील. आयुष्यात सर्व सुखी, समाधानी असल्यावर अहंकार ठेवू नका आणि दुःखी असल्यावर आत्मविश्वास गमावू नका असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

संचालक डॉ. अमोल गावंडे यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. डॉ. सोनाली साहा, डॉ. आशा किरण यांनी सूत्रसंचालन केले. पदवी प्रदान सोहळा यशस्वीतेसाठी डॉ. अतुलकुमार आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.