भविष्याचा वेध घेऊन पावले न टाकल्यास ऱ्हास अटळ; माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचा विद्यार्थी-पालकांना इशारा

0
208
पुणे, दि. १५ (पीसीबी) – तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबरोबरच त्याच्या प्रत्येक बदलाचा स्वीकार करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. कारण बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज बनली आहे. उद्याच्या जगात काय घडणार आहे, हे विद्यार्थी – पालकांनी जाणले नाही तर ऱ्हास अटळ आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले. काळाचा ओघ ओळखून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीवर प्रभुत्व, सेल्फ कॉन्फिडन्स, टीम वर्क या गोष्टी आत्मसात केल्या तरच स्पर्धेच्या युगात टिकणे शक्य आहे, असा सल्लाही गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना दिला.
             तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना  ‘बदले तंत्रज्ञान आणि उदयाचे जग’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उद्योजक डाॅ दिपक शहा होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संयोजक समिती अध्यक्ष शैलेश शहा, संचालक विलास काळोखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसीचे प्राचार्य जी.एस. शिंदे, निरूपा कानिटकर, राजश्री म्हस्के, संजय साने, परेश पारेख, संदीप काकडे, युवराज काकडे, विदुर महाजन, प्रा. वसंत पवार, एम. एम. ताटे, बी. के. रसाळ, रविकांत सागवेकर, राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जोशी, संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यंदाचा इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार उद्योजक राजेश म्हस्के व जागतिक दर्जाचे खेळाडू घडविलेले क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांना गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
             अच्युत गोडबोले पुढे बोलताना म्हणाले, की काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय किंवा स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी आज प्रत्यक्षात आल्या आहेत. आपले भविष्य याहूनही अधिक आधुनिक आणि कल्पनेच्या पलीकडचे असेल. भविष्यात आयटी हे सर्वात अग्रेसर क्षेत्र राहील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक साक्षर होण्याची गरज आहे. संगणकाच्या जन्मानंतर जग वेगाने बदलले. खुद्द संगणकातही अनेक बदल झाले. भविष्यात बदलाचा हा वेग अधिक प्रचंड असेल. भारताच्या ग्रामीण भागातही टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात पोहोचल्यास शिक्षणव्यवस्था बदलून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर बंधने राहणार नाहीत. अगदी कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या भव्य इमारतींची गरजच भासणार नाही. त्यामुळे प्रवासाची सक्ती जाऊन आपले छंद जोपासण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळतील.
 
           अनेक कामे घरी बसूनच तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येतील. ड्रायव्हरशिवाय मोटारींची कल्पना आता स्वप्न राहिलेली नाही. पुस्तके इंटरनेटवर सहज उपलब्ध होऊ लागल्याने जगभरातील पुस्तकांची अनेक दुकाने बंद झाली आहेत. पर्यटन व्यवसायाताही अमुलाग्र बदल होत आहेत. घरबसल्या पर्यटन शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढून कामाचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागून जवळपास ६३ टक्के लोकांचे जॉब जाण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना टेक्निकल बाबी आत्मसात कराव्या लागतील. तसेच बदलत्या जगातील संधी ओळखून विद्यार्थ्यांनी मिळेल त्या ठिकाणी नोकरी पकडावी किंवा उद्योग-व्यवसायात झोकून द्यावे, असा सल्लाही गोडबोले यांनी विद्यार्थी, पालकांना दिला.
          पाहुण्यांचा परिचय शैलेश शहा यांनी, सूत्रसंचालन वीणा भेगडे व संदीप भोसले यांनी, तर आभार युवराज काकडे यांनी मानले.