पुणे, २७ (पीसीबी) : टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. पुणेकरांसाठी आजचा दिवस काहीसा टेंशन देणारा असू शकतो. सीएनजी गाड्या वापरणाऱ्यांना आज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सीएनजी पंप चालकांचा हा संप अनिश्चित काळासाठी सुरू राहणार आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना सीएनजी उपलब्ध होणार नाही. टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची देखील पंपचालकांची मागणी आहे. या संपामध्ये पुणे ग्रामीणमधील सर्व पंप चालक सहभागी होणार आहे. यामुळे उद्यापासून पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहे.
उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. नफ्याचा हिस्सा न दिल्यानं प्रत्येक सीएनजी पंप चालकांचं २० लाखांचं नुकसान झालं आहे. यामुळे सीएनजी पंप चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालक बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.











































