चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे पर्यायी उमेदवार शंकर जगताप, आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांच्यासह 7 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. तर, 33 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
निवडणुकीसाठी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. यापैकी 33 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. तर, 7 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, 53 अर्जांपैकी 40 अर्ज पात्र झाले असून 13 अर्ज अपात्र झाले आहेत. उमेदवारी अर्जांची आज (बुधवारी) छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची घोषणा केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज पात्र झाल्याने पर्यायी उमेदवार शंकर जगताप यांचा अर्ज बाद झाला. उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा ‘बी’ फॉर्म अपूर्ण असल्याने आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांचा अर्ज बाद झाला. तर, प्रतिज्ञापत्र अपूर्ण सादर केल्याने अपक्ष चेतन ढोरे, पुरेशा सुचकांची स्वाक्षरी नसल्याने अपक्ष गणेश जोशी, आवश्यक सुचकांची नावे नसल्याने उमेश म्हेत्रे, उमेदवारी अर्ज अपूर्ण आणि एबी फॉर्म नसल्याने प्रकाश बालवडकर आणि वैधानिक तरतुदीनुसार अनामत रक्कम भरली नसल्याने संजय मागाडे अशा 7 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले.
            
		











































