मोठी बातमी ! भाजपचे आमदार आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

0
256

दि. १४ (पीसीबी) – लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे हावेरीचे आमदार नेहरू ओलेकर आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार आणि पक्षपात केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा दिल्याने लोकप्रतिनिधीं न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर होऊ शकतो.

सुमारे ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार नेहरू ओलेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी नातेवाईकांची मर्जी राखत काँक्रीट रस्त्यासह काही कामे त्यांच्या मुलांनाही दिलेली आहेत. बंगळूरच्या ९१ सीसीएच कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना आमदार नेहरू ओलेकर, त्यांची दोन मुले देवराज ओलेकर आणि मंजुनाथ ओलेकर यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे दुसरे एक आमदार एम. पी. कुमारस्वामी यांना बनावट धनादेश प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. ते मुद्देगीरीचे आमदार आहेत. आमदार कुमारस्वामी यांनी हुवाप्पा गौडा नावाच्या व्यक्तीकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले हेाते. हे पैसे परत करण्यासाठी आमदार कुमारस्वामी यांनी गौडा यांना दिलेले आठ धनादेश वठले नाहीत. यासंदर्भात हुवाप्पा गौडा यांनी आमदार कुमारस्वामी यांच्या विरोधात आठ खटले दाखल केले आहेत.