एमआयडीसी मधील सीईटीपी चे भूमिपूजन

0
243

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्टयात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारवी, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनामार्फे अखेर ‘कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट’(सीईटीपी) उभारण्याचे काम सुरू झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे सीईटीपीच्या कामाचे बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम एस कलकूटकी, एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने, पुणे मेटल फिनिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बनवट,पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव शहा, पालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह स्थानिक उद्योग संघटनांचे अधिकारी समारंभासाठी उपस्थित होते.

भोसरी एमआयडीसी येथील प्लॉट क्र. १८८/१ येथे या सीईटीपी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडचा औद्योगिक पट्टा महाराष्ट्र आणि भारतातील एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात ४ हजारहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या या ‍ठिकाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे १ हजार औद्योगिक युनिट्स घातक सांडपाणी आणि कचरा निर्माण करतात. या युनिट्समध्ये धोकादायक सांडपाणी, कचऱ्याची कायदेशीर आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही. या परिस्थितीमुळे माती आणि जल प्रदूषण होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पाठपुरावा करत असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सीईटीपी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने इतिसात पहिल्यांदा लघु उद्योजकांच्या समस्यांबाबत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत शहरात दोनवेळा उद्योगमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुंबईतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी विविध मागण्यांसह सीईटीपी उभारण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत उद्योगमंत्र्यांनी शब्द दिला होता. तो पूर्ण करीत उद्योजकांना दिलासा देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत येत असलेल्या एमआयडीसी भागात ‘कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट’ उभारण्यासाठी १.५ एकरचा भूखंड (प्लॉट क्र. टी-188/1, एमआयडीसी, भोसरी) नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात आला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड आणि ऑरेंज श्रेणीतील औद्योगिक युनिट्सचा संमती डेटा प्रदान केला आहे, अशी माहिती महापालिका पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

सदर प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले असून, ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सांडपाणी निर्मितीचे प्रमाण लक्षात घेता सुमारे १ दशलक्ष क्षमतेच्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. तथापि, तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर अंतिम क्षमतेचा निर्णय घेण्यात येणार आहे. सीईपीटी एकदा कार्यान्वित झाल्यानंतर माती आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया संजय कुलकर्णी यांनी दिली