– जनतेच्या पाठींब्यावर नाना काटे यांचा विजय निश्चित – मयूर कलाटे
पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली बेरोजगारी, गगनाला भिडलेली महागाई, राज्यात आणि देशांत जाणिवपूर्वक वाढविला जात असलेला जातीय तणाव, राष्ट्रपुरूषांचा भाजपा नेत्यांकडून केला जाणारा अवमानतसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेला भ्रष्ट कारभार या विरोधात ही निवडणूक आहे. चिंचवडची पोटनिवडणूक ही हुकूमशाहीच्या विरोधातील लढा असल्याने जनतेने ही लढाई मनावर घेतली आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सोसायट्यांमधील सभेमध्ये कलाटे बोलत होते. राज्य आणि केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या असंतोषाचा प्रत्यय आजच्या प्रचारादरम्यान आला. शेकडोंच्या संख्येने लोक स्वयंस्फूर्तीने या बैठकांमध्ये सहभागी होऊंन ‘नानां’ना पाठींबा देत होते.
पुढे बोलताना मयूर कलाटे म्हणाले, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या ध्येयधोरणाविरोधात असणारा असंतोष व्यक्त करण्याची मोठी संधी मतदार राजाला मिळाली आहे. त्या संधीचे मतदार सोने करतील यात शंका नाही. भाजपच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढल्याने महिला सुरक्षीत राहिल्या नाहीत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खालावली आहे. कोयता गँगने शहरात धुमाकुळ घातला आहे. सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तामुळे गुन्हेगारांवर कारवाई करताना पोलिसांवर बंधने येत आहेत, या बेबंदशाहीकडे जाणाऱ्या घटनांच्या विरोधात सरकारला जाग आणण्यासाठी ही निवडणूक एक संधी आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला हद्दपार करून शहराच्या आणि चिंचवडच्या विकासासाठी राष्ट्रवादीला संधी द्यावी, असे अवाहनही कलाटे यांनी केले.












































