अजित पवार म्हणतात… बिनविरोधची शक्यता कमी

0
255

पुणे, दि. २१ (पीसीबी) : पुण्यातील भाजपच्या कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगातप यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपकडून विविध नावांची चर्चा असली तर मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं दोन्ही मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे.

विधानसभचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणुका होण्याचे संकेत दिले आहेत. अनेक कार्यकर्ते दोन्ही जागेसाठी इच्छा व्यक्त करत आहेत. म्हणून ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याची मला शंका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील एका कार्यक्रमानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलताना बोलत होते.

आम्ही मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी, काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि मित्र पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी काल भेटून निवडणूक लढावी, अशी इच्छा व्यक्त केली. ते शरद पवार यांना देखील भेटणार आहेत. भाजपचा उमेदवार कोण असेल हे अद्याप माहिती नाही. मात्र, जगताप कुटुंबाची बैठक झाली त्यानंतर शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवलं असल्याची अंतर्गत बातमी आहे. कसबा विधानसभेसाठी भाजपची काही नावं पुढं येत आहेत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली आहे, त्याआधारे बोलत असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती ही इच्छुक आहेत, अशी माहिती. भाजप त्यांचा निर्णय घेईल आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही, असं अजित पवार म्हणाले.
दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळं ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मी साशंक आहे, असं अजित पवार म्हणाले.