अकोल्यात निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

0
496

अकोला, दि. २५ (पीसीबी) – अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये झालेल्या निवडणूक वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मतीन पटेल असे मयत कार्यकर्त्याचे नांव असून तो भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता होता.

या प्रकरणी अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे सर्व दहा आरोपी हत्याकांडानंतर फरार  झाले आहेत. मोहाळा हे हिदायत पटेल यांचे गाव आहे. दरम्यान  या घटनेत मुमताज पटेल नामक आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

लोकसभा निवडणूकीच्या वादातून मोहाळा गावातील काँग्रेस आणि भाजपच्या गटांत  शुक्रवारपासून धुसफुस सुरू होती. आज ( शनिवारी) लहान मुलांच्या भांडणावरुन हा वाद उफाळून आला.  दरम्यान या घटनेनंतर मोहाळा गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.