हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी; अन्यथा आत्महत्येचा इशारा
देहूरोड,दि.२३ -एकाच कुटुंबातील विक्रम रेड्डी आणि रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणांशी संबंधित व्यक्तींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. धमक्यांची सखोल चौकशी करून पोलीस संरक्षण द्यावे, तसेच हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी गुरुवारी (दि. २२) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले.
. न्यायालयात जाताना तसेच इतर ठिकाणी धमकावले जात असून, काही व्यक्तींकडून पाठलागही केला जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. या प्रकरणाशी संबंधित आरोपींच्या कुटुंबीयांसह बबलू रंगरेज, सफीर शेख, वाडी शेख, पप्पी शेख, समीर शेख आणि वेल्डिंगवाला उर्फ अरबाज शेख यांच्यासह अन्य काही व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
धमक्यांबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासह देहूरोड पोलीस ठाण्यात दोन ते तीन वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यास पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत, पोलिसांनी कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत हेमलता रेड्डी, शारदा रेड्डी, सोनाली रेड्डी आणि नंदकुमार यादव उपस्थित होते.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन
हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून न्याय व संरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. अन्यथा देहूरोड येथील स्वामी विवेकानंद चौकात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशाराही रेड्डी कुटुंबीयांनी दिला.

