पाणीपुरवठ्यातील अनागोंदी खपवून घेणार नाही! शिवसेनेचा महापालिका प्रशासनाला इशारा

PCB Admin
3 Min Read

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचे जल ऑडिट करा; प्रत्येक थेंबाचा हिशेब जनतेसमोर मांडा — शिवसेना आक्रमक

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर येत असताना प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर पाणीपुरवठा व्यवस्थेचा नेमका कारभार चालतो तरी कसा, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.

शहरात उपलब्ध होणारे पाणी, जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पुरवठा, जलकुंभांमधून होणारे वितरण आणि प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचणारे पाणी याचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर आला पाहिजे. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचे सविस्तर ‘जल ऑडिट’ करून प्रभागनिहाय, सेक्टरनिहाय आणि परिसरनिहाय दैनंदिन पाणीपुरवठ्याची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी, अशी ठाम मागणी फलके यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असेल, तर त्याचे निराकरण केवळ आश्वासनांनी होणार नाही. किती पाणी उपलब्ध होते, कुठे किती पाणी वितरित केले जाते, कोणत्या भागाला किती पाणी मिळते आणि वितरणादरम्यान किती पाणी वाया जाते, या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने आकडेवारीसह दिले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब मोजला गेला पाहिजे आणि त्याचा हिशेब जनतेसमोर मांडला गेला पाहिजे, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे.

निवेदनात प्रत्येक प्रभागातील दैनंदिन पाणीपुरवठ्याची नोंद ठेवणे, जलशुद्धीकरण केंद्रे आणि जलकुंभांशी संबंधित पुरवठ्याची माहिती संकलित करणे, तसेच प्रत्येक सेक्टर व परिसराला दररोज किती MLD (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी दिले जाते, याची माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच पाणीगळती, पाण्याचा अपव्यय आणि वितरणातील तफावत यांचा सखोल अभ्यास करून दोष दूर करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. प्रत्येक भागातील पाणीपुरवठ्याची वेळ, उपलब्ध पाण्याचे प्रमाण आणि पुरवठ्यातील अडचणी यांची माहिती नागरिकांना नियमितपणे मिळावी, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

“पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे; तो कोणाच्याही कृपेचा विषय नाही. नागरिकांनी पाणीपट्टी भरायची आणि तरीही पाण्यासाठी वणवण करायची, हे शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता पाणीपुरवठ्याचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर मांडावा. जल ऑडिट करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेल याची खात्री द्यावी,” अशी आक्रमक भूमिका राजेश किसनराव फलके यांनी मांडली.

महापालिका प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन जल ऑडिटची प्रक्रिया सुरू करावी, प्रभागनिहाय आणि सेक्टरनिहाय पाणीपुरवठ्याची आकडेवारी सार्वजनिक करावी आणि निवेदनावर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर शिवसेना गप्प बसणार नाही. पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करून पारदर्शक व्यवस्था निर्माण होईपर्यंत या विषयाचा पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धार शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके यांनी व्यक्त केला.

निवेदन सादर करताना युवासेना विभागप्रमुख रोहित शर्मा, विभागप्रमुख सुनील कानसकर, युवासेना सहसंपर्कप्रमुख राजीव मेनन आदी पदाधिकारी उपस्थित होते

Share This Article