मसाप पिंपरी – चिंचवड शाखेची निवडणूक कायदेशीर
– योगेश सोमण
पिंपरी (दिनांक : २१ ऑक्टोबर २०२६)
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेची निवडणूक कायदेशीर असल्याचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले.
दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी मसाप, पिंपरी – चिंचवड शाखेची निवडणूक झाली आणि नवीन कार्यकारिणी निवडून आली. सदर निवडणुकीवर काही सभासदांनी आक्षेप घेऊन पुणे येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच पुराव्याशिवाय वृत्तपत्रांतून शाखेवर आरोपाच्या फेरी झाडल्या गेल्या.
याची दखल घेऊन मसाप, पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुणे कार्यालयात बैठक बोलावली होती. सदर बैठकीस प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, मसाप, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, जिल्हा प्रमुख प्रभाकर ओव्हाळ, सभासद संजय राक्षे, डॉ. मीनल लाड, नीलिमा फाटक; तर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी चंद्रकांत धस, प्रकाश निर्मळ आणि संदीप तापकीर उपस्थित होते. आक्षेप घेणारे सभासद बैठक संपता संपता उशिरा आल्यामुळे योगेश सोमण यांनी पुन्हा बैठकीस सुरुवात करून चर्चा केली. त्यांची बाजू ऐकून आधी झालेल्या चर्चेचा आढावा सांगितला. आक्षेप घेणाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबी, कागदपत्रे काळजीपूर्वक तपासल्याचे सांगितले आणि निवडणूक घटनेनुसार कायदेशीर झाल्याचे नमूद करून सर्व आक्षेप फेटाळून लावले.
अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, केंद्र संस्थेस सादर केलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेनुसार निवडणुकीस निरीक्षक नेमण्याची विनंती करणारे पत्र केंद्रास वेळेत प्राप्त झाले होते. निवडणूक अधिकारी नेमण्याचा अधिकार हा ज्या त्या शाखेचा विषय असतो हे निक्षून सांगताना पिंपरी – चिंचवड शाखेने ते कायदेशीररीत्या पाळले असल्याचेही नमूद केले. शेवटी निर्णय देताना पिंपरी – चिंचवड शाखेची निवडणूक कायदेशीररीत्या वैध असल्याचे जाहीर केले.
सोमण यांनी साहित्यिकांना वृत्तपत्रांशी बोलताना, सोशल मीडियावर लिहिताना त्यांनी संयम ठेवून एकेरी भाषा, अपशब्द, वैयक्तिक टिप्पणी टाळण्याचे सांगून, चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.
मसाप पिंपरी – चिंचवड शाखेची निवडणूक कायदेशीर- योगेश सोमण

