१८ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळे सौदागर येथील ‘गणेशम फेज २’ सोसायटीत घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत महापालिकेच्या अग्निशमन दलाची दुरवस्था आणि प्रशासकीय ढिसाळपणा उघड झाला आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधी तथा भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा.श्री.शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्त यांना कडक शब्दांत लेखी निवेदन सादर केले.
शहरातील गगनचुंबी इमारतींसाठी ५० ते ९० मीटरच्या हायड्रोलिक शिड्यांची तातडीने खरेदी करावी, अग्निशमन साहित्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करावे आणि सोसायट्यांचा ‘फायर ऑडिट’ अहवाल पुढील ७ दिवसांत जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर येथील दुर्घटनेत एका बंद फ्लॅटमध्ये दोन निष्पाप लहान मुली जिवंत अडकून पडल्या होत्या. त्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात असताना अग्निशमन दलाच्या जवानांकडे असणाऱ्या नादुरुस्त व अपुऱ्या उपकरणांमुळे तसेच नियोजनाच्या अभावामुळे बचावकार्यात प्रचंड अडथळे आले. शहरात २० ते ३० मजल्यांच्या उंच इमारती उभ्या राहत असताना तेथपर्यंत पोहोचू शकतील अशा आधुनिक हायड्रोलिक शिड्या (Hydraulic Ladders) पालिकेकडे उपलब्ध नसणे, ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
भाजपने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या:
- अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्यांची तातडीने खरेदी: ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या हायड्रोलिक शिड्या/प्लॅटफॉर्म्स (Bronto Skylift) अग्निशमन ताफ्यात तात्काळ समाविष्ट कराव्यात.
- ’फायर ऑडिट’ अहवाल ७ दिवसांत जाहीर करा: शहरातील एकूण किती सोसायट्यांचे फायर ऑडिट पूर्ण झाले आहे, किती ठिकाणी त्रुटी आहेत आणि किती सोसायट्यांना नोटिसा दिल्या आहेत, याचा सविस्तर अहवाल महापालिकेने सार्वजनिक करावा.
- अग्निशमन यंत्रणेचे ‘सेफ्टी ऑडिट’: अग्निशमन दलातील सर्व वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क आणि बचाव उपकरणांचे तातडीने ऑडिट करून जुनाट साहित्य मोडीत काढून नवीन अत्याधुनिक साधने पुरवावीत.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व मॉकड्रिल: जवानांना उंच इमारतींमधील आपत्कालीन बचावकार्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे व शहरातील सोसायट्यांमध्ये नियमित ‘मॉकड्रिल’ (Mock Drill) आयोजित करण्यात यावेत.
”पिंपरी-चिंचवडकर नागरिकांचा आणि त्यांच्या लहान मुलांचा जीव अत्यंत मोलाचा आहे. केवळ इमारतींना मंजुरी देऊन करवसुली करण्यापुरती महापालिकेची जबाबदारी मर्यादित नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘गणेशम फेज २’ मधील घटना ही प्रशासनासाठी शेवटची धोक्याची घंटा आहे. महापालिकेने येत्या ८ ते १० दिवसांत या मागण्यांवर ठोस पावले उचलावीत अशी नम्र विनंती.”
-श्री शत्रुघ्न (बापु) काटे
शहराध्यक्ष,भाजप पिंपरी-चिंचवड शहर

