आयुक्त साहेब, स्पीड ब्रेकरला जरा ‘ब्रेक’ लावा !पिंपरी-चिंचवडमध्ये उंचच उंच स्पीड ब्रेकर; अपघाताचा धोका वाढला, वाहनांचेही होते नुकसान

bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. १९ : वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी हे स्पीड ब्रेकर इतके उंच आणि अवाजवी आकाराचे आहेत की, वाहनांचा वेग कमी करण्याऐवजी तेच अपघातांना निमंत्रण देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुनिल पारेख यांनी निदर्शनास आणून दिले.

उंच स्पीड ब्रेकरवरून जाताना वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नसल्यास अपघाताचा धोका आणखी वाढतो. तसेच वारंवार उंच स्पीड ब्रेकरवरून वाहने गेल्यामुळे टायर, सस्पेन्शन, शॉक ॲब्झॉर्बर आणि वाहनांच्या इतर भागांचे नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर हवेत; पण नियमांच्या चौकटीत!

वाहनांचा वेग नियंत्रित करणे आवश्यक आहे; मात्र त्यासाठी उभारण्यात येणारे स्पीड ब्रेकर हे योग्य तांत्रिक निकष, उंची, रुंदी आणि आकारानुसार असणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातील सर्व स्पीड ब्रेकरचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.

ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची उंची किंवा आकार अवाजवी आहे, ते तातडीने कमी करावेत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची योग्य पूर्वसूचना देणारे फलक व रस्त्यावर स्पष्ट मार्किंग करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

“आयुक्त साहेब, स्पीड ब्रेकरला जरा ब्रेक लावा!”
“शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर आवश्यक आहेत; मात्र स्पीड ब्रेकरच्या नावाखाली नागरिकांना त्रास आणि वाहनांचे नुकसान होऊ नये. महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व स्पीड ब्रेकरची पाहणी करून नियमबाह्य व अवाजवी उंचीचे स्पीड ब्रेकर तातडीने कमी करावेत,” अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिका प्रशासन याबाबत तातडीने निर्णय घेणार का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Share This Article