अन्नामृत फाउंडेशनच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन; सुमारे ३०० शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक आहार
पिंपरी, दि. ११ : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आज उद्घाटन करण्यात आले. या अद्ययावत सुविधेमुळे महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ३०० शाळांमधील तब्बल ५७ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषणमूल्ये यांचा विचार करून केंद्रीय स्वयंपाकगृह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत करण्यात आले आहे. आहार तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार मिळणे हीदेखील आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असून, या व्यवस्थेमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखणे आवश्यक आहे. आधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आलेले हे केंद्रीय स्वयंपाकगृह त्यादृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.”
महापौर लांडगे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांना मिळणारा प्रत्येक घास हा सुरक्षित, पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण असावा, ही महानगरपालिकेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातही विद्यार्थीकेंद्री उपक्रमांना प्राधान्य देत महानगरपालिकेच्या माध्यमातून शैक्षणिक व पोषणविषयक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.”
आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य
या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तथा आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी आधुनिक व अधिक सक्षम व्यवस्था उभारण्यास मदत झाली. महानगरपालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे काम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक पोषण मिळण्यामध्ये या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे केवळ आहाराचे वितरण न करता त्याची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि पौष्टिकता सातत्याने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याच उद्देशातून केंद्रीय स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरु गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह अन्नामृत फाउंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहामुळे मोठ्या प्रमाणावर पोषण आहार तयार करण्याची क्षमता, स्वच्छता व अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत गुणवत्तापूर्ण आहार पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण व उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे.

