पिंपरी, दि. १३ – मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने संपूर्णा मागण्या समजावून घेऊन त्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.
जलवाहिनी प्रकल्प बाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि आंदोलक, धरणग्रस्त सर्व शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यावर याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
पवना धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामोबदल्यापोटीच्या जमिनीचे वाटप करावे. मावळसाठी किती पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे, याचा खुलासा करावा. पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मावळ तालुक्यातील गावांना शुद्ध पाणी द्यावे. आंदोलनात जखमी झालेल्यांना महापालिकेत नोकरी द्यावी. महापालिकेने धरण क्षेत्रातील विकास कामे करावीत. पवनाधरणग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना महापालिकेतील नोकरीसाठी पाच टक्के कोटा आरक्षित ठेवावा. पवना नदी मृत होणार नाही, पाणीसाठा जिवंत राहील, या पद्धतीने नदी स्वच्छ ठेवावी. परिसरातील गावांना स्वच्छ पाणी मिळावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या. त्यावर जलवाहिनीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत सुरुवातीलाच माफी मागून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविल्या जातील. जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. सर्वांनी सकारात्मकपणे पुढे जावे. त्यात सर्वांचेच हित आहे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करेल. प्रश्नांबाबत पूर्ण आश्वासन मिळाल्यानंतरच प्रकल्पाबाबत पुढील कारवाई केली जाईल.पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी म्हणाले, पवना नदीलगतची कामे हाती घेतली आहे. नदीकाठी एसटीपी उभारले जाणार आहेत. त्याची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. पवना बंदिस्त जलवाहिनी योजना अतिशय आवश्यक आहे. नदी पात्रातील पाणी खराब झाले आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणल्यास शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल.
आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर अतिशय सकारात्मत बैठक झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडस्या आहेत. त्यापैकी किती मागण्या पूर्ण होतील, याबाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक होणार आहे. शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय न होता ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

