जुना पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तब्बल १० लाख ८५ हजार रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२८ जून) पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील सुदामाचे पोहे हॉटेल समोर करण्यात आली.
या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रणधिर माने यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी आर्यन रविंद्र यादव (२०, पुणे) आणि शोएब शकिल शेख उर्फ वस्ताद (२५, रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे जुन्या पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर सीएनजी पंपाशेजारी बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून १० लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचे ९८.५६ ग्रॅम वजनाचे एम. डी. ड्रग्ज, एक दुचाकी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हे ड्रग्ज गणेश पेठ येथील शोएब शेख याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले असून दापोडी पोलीस तपास करत आहेत.

