दि.१७(पीसीबी)-एका नामांकित कंपनीने मागवलेल्या एकूण २०.३८० मेट्रीक टन सी.आर.सी.ए स्क्रॅप मालापैकी ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा ७ मेट्रीक टन माल कंपनीत न उतरवता त्याचा परस्पर अपहार करण्यात आला. ही घटना २६ मे रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील कोरस इंडिया लिमिटेड (पेफको फाऊंड्री डि) कंपनीत घडली.
या प्रकरणात अस्लम बशीर शेख (४०, थेरगाव, पुणे) यांनी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मानिक लाटे (देहुगाव, पुणे) आणि संतोष लाटे (मोशी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीने एस.बी.ए. मेटल अॅन्ड स्टील प्रा.लि. कुरुळी (ता. खेड) येथून १० लाख ५८ हजार १२९ रुपये किमतीचा सी.आर.सी.ए. स्क्रॅप माल मागवला होता. हा माल आरोपींच्या ताब्यातील ट्रक (एमएच १४ बीजे ३४२९) मधून कंपनीत खाली करण्यासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, आरोपींनी त्यातील १३ मेट्रीक टन माल खाली उतरवला आणि उर्वरित ७ मेट्रीक टन माल स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर लांबवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
