दि.०३(पीसीबी)- जिल्ह्यात अल्पवयीनांवरील गुन्ह्यांच्या दोन गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. चाकणजवळील दक्षिण महाळुंगे येथे तीन वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर हिंजवडी परिसरात एका सुरक्षारक्षकाला लैंगिक चाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
महाळुंगे येथे तीन वर्षांच्या बालकाचा खून
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे (चाकण) येथे राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने घराजवळून फूस लावून बंद खोलीत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. मुलाचा मृतदेह लेबर कॅम्पमधील एका खोलीत आढळून आला.
हा मुलगा परराज्यातून कामासाठी आलेल्या आई व काकासोबत राहत होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
हिंजवडीत सुरक्षारक्षक अटकेत
दरम्यान, आयटी पार्क हिंजवडी फेज २ मधील एका सोसायटीत खेळणाऱ्या नऊ वर्षीय दोन मुलींना बोलावून त्यातील एका मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी सुरक्षारक्षक विजय मधुकर चव्हाण (वय २४, मूळ रा. यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, तक्रारीनंतर मध्यरात्री गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
या दोन घटनांमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे












































