लोंबकाळणा-या केबलने घेतला संपदा पटवर्धन यांचा जीव
दि. ३०(पीसीबी)-वीस दिवसांपूर्वी वडिल दगावल्याने आधीच दु:खात असलेल्या संपदा पटवर्धन यांचा तुटलेल्या केबलने जीव घेतल्याची दुर्दैवी घटना निगडी प्राधिकरण येथे मंगळवारी(२८ एप्रिल) घडली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पटवर्धन यांचा बळी गेल्याने या घटनेमुळे निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी अतिशय संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या दुर्घटनेवर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा ही निष्पाप महिला बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.
घरातील काही वाणसामान आणण्यासाठी बाहेरुन घरी परतत असताना घराजवळच सेक्टर २६ प्रबोधन सोसायटीतून ज्ञानप्रबोधिनीकडे जाणा-या रस्त्यावर लोंबकळणारी केबल गळ्यात अडकल्याने पटवर्धन गाडीवरुन खाली कोसळल्या. गाडीचा आवाज आल्यामुळे जवळपास असलेल्या अज्ञात मुलांनी त्यांना निगडीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी घडली. डोक्याला लागलेल्या मारामुळे त्या दोन दिवस कोमात होत्या त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती संबंधितांनी दिली.
पटवर्धन यांचे वडील २० दिवसांपूर्वी दगावले. या धक्क्यातून आईला सावरण्यासाठी त्यांनी आपल्या घरी राहण्यास बोलावले होते. वडिलांच्या धक्क्यातून बाहेर पडण्याआधीच काळाने घातलेल्या या घाल्यामुळे या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पटवर्धन यांच्या मागे मुलगा स्वानंद (वय २९ वर्षे), मुलगी क्षिप्रा (वय २२ वर्षे) आणि पती असा परिवार आहे. सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेणा-या प्रचंड उत्साही आणि एक उत्तम मैत्रीण अशी त्यांची प्राधिकरण भागात ओळख होती. त्यामुळे मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी त्यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली आहे.
सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय सहभाग, सूत्रसंचलनाची आवड, मंगळागौरीच्या खेळांचा ग्रुप, प्रचंड उत्साही अशी त्यांची ओळख त्यांच्या मैत्रीणी सांगतात. निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या त्या कोषाध्यक्ष होत्या. उत्साही असलेल्या पटवर्धन यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे चांगली मैत्रीण गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्राधिकरण परिसरात हरित सेतू प्रकल्पामुळे लहान झालेले रस्ते आणि वाहतूक समस्येमुळे नागरिक बेजार आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे पटवर्धन यांचा नाहक बळी गेल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांवर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत घटनेचा तीव्र निषेध केला.
शहरभर लोंबकळणा-या केबलचा फास
विविध खासगी कंपन्यांच्या इंटरनेट व इतर केबल्सचे वाढलेले जाळे याच्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील निगडी – प्राधिकरण, काळेवाडी, पिंपळे गुरव, भोसरी, पिंपरी , मोशी, चिंचवड अशा सर्वच भागात या वायर लटकलेल्या पाहायला मिळतात. या खासगी कंपन्यांना या केबलसंबंधी योग्य नियमावली असायला पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत.












































