दि.२२(पीसीबी)- सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘मेटा’ (Meta) आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्मचारी कपातीची (Layoffs) तयारी करत आहे. 20 मे पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून यामध्ये सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर दिलेला अतोनात भर आणि कंपनीला अधिक वेगवान बनवण्याच्या धोरणामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामचे मालक मार्क झुकरबर्ग सध्या कोणत्या नवीन फिचरमुळे नव्हे तर हजारो कुटुंबांची झोप उडवणाऱ्या बातमीमुळे चर्चेत आहेत. 20 मे ही तारीख मेटाच्या जागतिक वर्कफोर्ससाठी अत्यंत कठीण असणार आहे. कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे ठरवले असून ही केवळ एका मोठ्या बदलाची सुरुवात मानली जात आहे. विशेष म्हणजे 2026 च्या अखेरीस कपातीचा दुसरा टप्पाही येण्याची शक्यता असून त्यावेळी हा आकडा अधिक मोठा असू शकतो.
मेटाच्या या निर्णयामागे एआय (AI) क्षेत्रातील वाढती स्पर्धा हे मुख्य कारण आहे. या रेसमध्ये अव्वल राहण्यासाठी जुकरबर्ग यांनी यावर्षी एकट्या एआयवर 135 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 2028 पर्यंत अमेरिकेत एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी 600 अब्ज डॉलर्सचे बजेट ठेवण्यात आले आहे. कंपनीचे साधे गणित असे आहे की जे काम सध्या माणसे करत आहेत, ते काम भविष्यात एआय एजंट्स आणि मशीनकडून करून घेता येईल.
कंपनीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक तज्ज्ञ इंजिनिअर्सना ‘अप्लाइड एआय’ (Applied AI) या नवीन टीममध्ये पाठवले जात आहे. ही टीम असे ‘ऑटोनॉमस एआय एजंट’ विकसित करत आहे. जे स्वतः कोड लिहू शकतील आणि मानवी मदतीशिवाय कठीण कामे पूर्ण करतील. यावरून कंपनी कोणत्या भूमिका एआयने रिप्लेस करायच्या याचे सूक्ष्म नियोजन करत असल्याचे स्पष्ट होत आहे.










































