भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण

0
2

नवी दिल्ली: भारताची जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले मूल्यमापन आणि जीडीपीच्या सुधारित आकडेवारीमुळे भारताला पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर यावे लागले आहे.

२०२४ मध्ये ३.५ ट्रिलियन डॉलरसह भारत पाचव्या क्रमांकावर होता, तर युनायटेड किंगडम ३.४ ट्रिलियन डॉलरसह सहाव्या क्रमांकावर होता. मात्र, २०२५ मध्ये ब्रिटनने भारताला मागे टाकले होते. भारताचा आर्थिक विकास दर इतर प्रमुख देशांच्या तुलनेत अधिक असूनही ही घसरण झाली आहे. याची दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. प्रथमत: जागतिक क्रमवारीत जीडीपीचे मोजमाप डॉलरमध्ये केले जाते. २०२४ मध्ये ८४.६ रुपये वर असलेला रुपया २०२५ मध्ये ८८.५ रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरला होता. रुपयाच्या या कमकुवतपणामुळे डॉलरमधील भारताचा जीडीपी ब्रिटनच्या तुलनेत कमी भरला. तसेच जीडीपी मोजण्याच्या नवीन पद्धतीमुळे भारताच्या विकास दराच्या अंदाजात करण्यात आलेली सुधारणाही या घसरणीला कारणीभूत ठरली आहे.

डॉलरसह पाउंड, युरो, युआन, रियाल व इतर सर्वच प्रमुख परकीय चलनाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन सातत्याने होतं आहे. २०२५ मध्ये ८८.५ रुपये प्रति डॉलर आता २०२६ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया ९५ रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरला आहे. इराण – इस्राईल अमेरिका युद्धा व आखाती देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे उंधनाच्या दरांत झालेली वाढ व तुटवडा यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन अधिक होणार आहे. या सर्व घटनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक क्रमवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार २०२९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर येणे आता शक्य नाही, त्यासाठी भारताला अजून ३-४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

जागतिक क्रमवारीत कोण कुठे? (२०२५ चा अंदाज)

१. अमेरिका: ३०.८ ट्रिलियन डॉलर
२. चीन: १९.६ ट्रिलियन डॉलर
३. जर्मनी: ४.७ ट्रिलियन डॉलर
४. जपान: ४.४४ ट्रिलियन डॉलर
१. युनायटेड किंगडम : ४ ट्रिलियन डॉलर
२. भारत: ३.९२ ट्रिलियन डॉलर