खरातला भेट मिळालेली ९० लाखाची मर्सिडीज कार जप्त

0
4

दि.१४(पीसीबी)-अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने त्याच्या बेकायदेशीर मालमत्तेवर कारवाई सुरू करत आलिशान मर्सिडीज कार जप्त केली आहे. या प्रकरणामुळे खरातच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ही कार पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून फसवणुकीच्या माध्यमातून मिळवण्यात आली होती. आपल्या व्यवसायात प्रगती व्हावी या उद्देशाने जासूद यांनी खरातशी संपर्क साधला होता. मात्र, याच संधीचा फायदा घेत खरातने त्यांच्याकडे परदेश दौऱ्याची आणि महागडी कार देण्याची मागणी केली.

इतकेच नव्हे, तर “मर्सिडीज कार दिली नाही तर मृत्यू ओढवेल” अशी भीती दाखवून जासूद यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या भीतीपोटी जासूद यांनी 31 ऑगस्ट 2018 रोजी पुण्यातील शोरूममधून सुमारे 90 लाख रुपये किंमतीची कार खरेदी केली. त्यासाठी 15 लाख रुपये रोख भरले गेले, तर उर्वरित 75 लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात उचलले गेले.
या कारचे पासिंग पुण्यात न करता नाशिकमधून करण्यात आले होते. यामागे अंकशास्त्र (Numerology) संबंधित श्रद्धा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कारसाठी 8181 हा विशेष क्रमांक घेण्यात आला होता, ज्याची बेरीज ‘9’ होते. हा अंक शुभ मानत असल्यामुळे या नंबरसाठी अतिरिक्त रक्कमही खर्च करण्यात आली होती.

याशिवाय, खरातच्या आवारात उभ्या असलेल्या इतर वाहनांवरही ईडीचे लक्ष आहे. त्यातील एका गाडीचा क्रमांक 6453 असून त्याची बेरीजही ‘9’ येते. त्यामुळे अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या आधारे संपत्ती उभी केल्याचे तपासात दिसून येत आहे. ईडीने विविध ठिकाणी तपासणी करत आणखी मालमत्ता आणि व्यवहारांची चौकशी सुरू ठेवली आहे. खरातने इतरही व्यक्तींना अशाच प्रकारे जाळ्यात ओढले असण्याची शक्यता तपासली जात आहे.