बांधकाम साईटवर सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

1 Min Read

चऱ्होली बुद्रुक येथील एका बांधकाम साईटवर सहाव्या मजल्यावरून पडून एका १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना २६ मार्च रोजी घडली. कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी बिल्डर आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

बसवराज संगणा बनसोडे (४३, पोरवाल रोड, लोहगाव) आणि केदार कुलकर्णी (पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रमेश ढवळे यांनी शनिवारी (११ एप्रिल) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इसराफिल (१९) असे मृत मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथील अजिंक्य सिंग या बांधकाम प्रकल्पावर सहाव्या मजल्याचे स्लॅब खोलण्‍याचे काम सुरू होते. इमारतीच्या मधोमध असलेल्या डकच्या मोकळ्या जागेत कोणतीही सुरक्षा जाळी बसवण्यात आली नव्हती. आरोपींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने निष्काळजीपणा केल्याने मजूर इसराफिल या मोकळ्या जागेतून थेट खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Share This Article