उन्हाळ्यात ST ची मोठी भाडेवाढ; 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या खिशाला कात्री

0
2

दि.०८(पीसीबी)- उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे. एसटी बसच्या भाड्यात तब्बल १० टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही दरवाढ १५ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात शाळांना सुट्ट्या लागल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाकडे किंवा पर्यटनासाठी प्रवास करतात. याच गर्दीच्या हंगामात भाडेवाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.गर्दीच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे महामंडळावर टीका होत असून, प्रवाशांकडून भाडेवाढ मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.