“खंत मनी जीवा”

0
3
  • मधू जोशी, माजी नगरसेवक

भाजपचा ४६ वा वर्धापनदिन सोमवारी होता. गल्ली ते दिल्ली एकहाती सत्ता असलेल्या या पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या जेष्ठ कामगारनेते, पत्रकार आणि जनसंघाचे काळात तत्कालिन नगरपालिकेचे माजी नगरसेवक मधू जोशी यांनी पक्षाच्या सद्य स्थितीबद्दल परखड विचार त्यांच्या ब्लॉकवर मांडले आहेत. त्यांच्याच शब्दांत ते जसे आहेत तसे देत आहोत…

कालच भारतीय जनता पार्टीचा ४६वा वर्धापन दिन देशभर राज्यभर आपल्या शहरात देखील साजरा झाला! दीर्घ पल्ल्याच्या राजकीय क्षेत्रात ४६ वर्ष हा मोठा काळ नाही मात्र संघटनेला आपलं आत्मपरीक्षण करणे चिंतन करणे यासाठी नक्कीच पुरेसा आहे काँग्रेस पक्ष कसा स्थापन झाला कसा वाढला व आज शंभर वर्षाहून अधिक वय असलेले हा पक्ष त्याची वाताहत पहाताना विरोधकांना देखील खरंच खेद होतो वाईट वाट त पण त्याचं सिंहावलोकन केलं तर या भल्या मोठ्या देशभर विस्तारित झालेल्या पक्षाला जी आज अवस्था प्राप्त झाली आहे त्याला इतर कोणी नाही तर तो पक्ष त्याचं नेतृत्व जबाबदार आहे असं लक्षात येईल फक्त हवेवर चालणारे नेते पक्ष व कार्यकर्त्यापासून दुरावले जातात आणि कुठल्याही संघटनेचा कणा हा कार्यकर्ता असतो हे विशेषतः राजकीय क्षेत्रात वारंवार अनुभवाला येतं अस असूनही श्री गडकरी म्हणाले तसं राजकारण हे आता फक्त सत्ताकारण झाल असल्यामुळे त्याची लोकातील राजकारणाविषयीची भावना अतिशय चिंतनीय व चार हात दूर राहावे अशीच भावना निदान जाणकार सर्वसामान्य नागरिक यांच्या मनात दिसते !सत्ता मिळवायची मग कुठलाही मार्ग स्वीकारावा लागला कुठलेही हत्यार हाती घ्यावं लागलं तरी ते घ्या पण सत्तेवर या हा नवा मंत्र भविष्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक व चिंता दायक आहे अशा परिस्थितीत मूल्य माती मोल होतात विश्वास पूर्णतः संपून जातो व फक्त आजचा दिवस व सत्ता एवढ्याच विचारात सगळे कार्यरत असतात
काँग्रेस पक्षासारखीच देशात पर्याय म्हणून समोर येऊ शकेल असे समाजवादी व कम्युनिस्ट पक्ष व चळवळ वरील कारणामुळेच आज नगण्य झाली आहे काही अपवाद वगळले तर त्यांची नोद ही कोणी घेत नाही!
या इतिहासाची नोंद घेऊन आपला मार्ग आपली तत्व आपलं उद्दिष्ट आपले ध्येय याबाबतीत भारतीय जनता पक्षाने अधिक गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे
हे खरं आहे की गंगा नदीचा पावित्र्य तिच्या उगमाच्या ठिकाणी जे असे ते पुढे अलाहाबादला व तिथे जिथे वाहते तिथे राहिल असं नाही फक्त भावनात्मक पावित्र्य दिसेल कदाचित पण तिच्या प्रवासात जे अनेक इतर प्रवाह नद्या नाले ओढे व अनेकदा लोकांनी सोडलेलं सांडपाणी हे सगळं त्या पवित्र नदीत मिसळलं जातं अनेक ठिकाणी प्रेत टाकली जातात अशावेळी त्या गंगा नदीला दोष देता येईल का? काय करावं लागेल यासाठी शुद्धी करण्याच्या मोठ्या योजना होतील तेव्हा होतील पण त्याआधी नदीला स्वतः आपला वेग वाढवावा लागेल त्यामुळे अनावश्यक जमा झालेला कचरा व घाण दोन्ही किनाऱ्याला फेकली जाऊन काही प्रमाणात ती शुद्ध होऊ शकेल भारतीय जनता पार्टीमध्ये वर म्हटल्याप्रमाणे सत्ता कारणामुळे येऊन मिळालेले अनेक प्रवाह त्यांच्या बॅड एलिमेंट्स सकट मिळालेले आहेत त्यांचा उपयोग सत्तेसाठी निश्चित झाला हे अमान्य करता येणार नाही पण त्यामुळे पक्षाचं ध्येय धोरण अंतिम उद्दिष्ट हे गाठण्याबाबत समर्पित कार्यकर्ते व सामान्य जनता देखील आता साशंक आहे ही भविष्याच्या दृष्टीने खूप गंभीर व चिंताजनक आहे
पक्षाच्या संघटनेच्या सुरुवातीच्या काळात पूर्ण समर्पित कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ४६ व्या वर्धापन दिनी पूर्ण विसर पडल्याचा अनुभव घेतो आहे !कुठे पद मिळावं सत्कार समारंभ व्हावेत गौरव वहावा अशी मुळीच इच्छा नसते तसं वयही नसतं आणि सक्रिय होऊन शक्यही नसतं पण दुर्दैवाने ही समाज परंपरा आहे अगदी हापूस आंब्याचे झाड देखील एकदा फळ देईनासं झालं की ते झाड आणि निवडुंग सारखेच समजले जातात फक्त बिचारे पक्षी आपली घरटी सांभाळत त्या झाडावर राहतात
मला एक प्रसंग आठवतो महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असे कैलास वासी श्री यशवंतराव चव्हाण यांचे जवळपास शेवटच भाषण आळंदीला एका सभेत मला ऐकायला मिळालं त्यावेळी त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्याच पण त्यानंतर त्यांना औद्योगिक क्षेत्रातील लघुउद्योजकांचे काही प्रश्न व त्यावरचे निवेदन देण्यासाठी तात्या सपकाळ व त्यांचे इतर सहकारी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांनी माईक अधिक जवळ घेऊन अतिशय दाटलेल्या कंठाने सांगितलं की सिंह एकदा म्हातारा झाला त्याची नख आया ळ गळून गेलं तर त्याची इतकी वाईट अवस्था होते की छोटा उंदीर देखील त्याची शेपटी ओठू शकतो ! तुमचं निवेदन मी घेऊन फार तर पुढे पाठवू शकतो पण या पलीकडे काही करू शकणार नाही क्षमा करा”मी व मंचावर उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले ज्याने एमआयडीसी प्रथम या भागात आणली त्यांना तिथल्या लघु उद्योजकांसाठी काही करण्याची इच्छा असूनही त्यांना हातबलता व्यक्त करावी लागली हा दैवाचा दुर्विलास पहावा लागला
काल भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सर्वत्र समारंभ पूर्वक कार्यक्रम होत असताना आमच्यासारख्या जुन्या समर्पित व वेड्यासारखं पक्षासाठी काम करणाऱ्या आणि आता यशवंतराव म्हणाले तसं आयाळ आणि नख गळालेले हे वैभव हे समारंभ पंतप्रधान मुख्यमंत्री आमचे आमदार खासदार या सर्वांचं मनःपूर्वक कौतुक करत असताना फक्त दोन हात जोडणे आशीर्वाद देणे यापलीकडे काहीच सहभाग घेऊ शकलो नाही एखादा स्थानिक अपवाद वगळता हे शल्य मनात आलं
वास्तविक जनसंघाच्या स्थापनेपासूनचा जवळपास पूर्ण इतिहास व प्रत्यक्ष पक्ष जडणघडणेची प्रचाराची जबाबदारी ७० वर्षाहून अधिक काळ श्यामाप्रसाद पीताबरदास डॉक्टर रघुवीर माथुर दीनदयाळजी अटलजी अडवाणीजी व नंतरच्या काळात प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे उत्तमराव पाटील इत्यादींचा झंजावात हा पाहिला आहे अनुभवला आहे तो जर आताच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला गेला तर पक्षाची मुळ तत्व उद्दिष्ट व कार्यपद्धती याबाबत जागरूकता येऊन कार्याची गुणवत्ता वाढेल व समाजात विश्वासार्हता वाढेल यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत अस वाटत
महाराष्ट्रातल्या एका सर्वात मोठ्या नेत्याने प्रवासात मला विचारलं होतं की इतका सगळा पक्ष उभा केला पण विश्वासहार्यता अपेक्षे सारखे का मिळू शकली नाही त्यावर मी म्हटलं होतं की साहेब क्षमा करा पण मला जे जाणवल ते सांगतो की तुम्ही तुमच्या भोवती फक्त गुणगान करणारे नेते सांभाळले”गुणवान”नाहीत! त्या पक्षाची अवस्था काँग्रेस सारखे झाली आहे याचा आनंद होण्यापेक्षा दुःख होतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष टिकला पाहिजे वाढला पाहिजे मात्र सत्तारूढ असो व विरोधी असो त्यांनी जनतेला अपेक्षित असलेली मूल्य जपली पाहिजेत आणि त्यासाठी एकमेव कसोटी आहे ती म्हणजे फक्त राष्ट्र प्रथम राष्ट्राचा विचार