सहा किलो गांजासह वृद्धाला अटक चिंचवडमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

0
7

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका ६८ वर्षीय वृद्धाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल शिवाजीराव गायकवाड (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) रोजी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. जवाहर अर्जुनदास रामनानी (वय ६८, रा. रावी ब्लॉक, पिंपरी) असे गुन्‍हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दळवीनगरकडून लोकमान्य हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी जवाहर रामनानी याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा १ मोबाइल आणि सहा किलो ५५ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या मिळून आला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिजुर्डे पुढील तपास करत आहेत.