जमीन खरेदीच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक; शिरगाव पोलिसांत दाम्‍पत्‍याविरोधात गुन्हा दाखल

0
6


पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – जमिनीच्या व्यवहारातून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. या प्रकरणात जमीन नावावर न करता उलट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे घडली.
संजय पांडुरंग नरोडे (वय ५५, रा. औंध, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. ३) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोहन जयवंत येवले (वय ५८) आणि आशा मोहन येवले (वय ५१, दोन्ही रा. आढले पूर्व, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्‍टोबर २०२० ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरोडे आणि आरोपी यांच्यात आढले खुर्द येथील गट क्रमांक २५५ मधील १५ हजार चौरस फूट जागेबाबत सामंजस्य करार (MOU) झाला होता. या व्यवहारापोटी आरोपी आशा येवले यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे २० लाख रुपये आणि मोहन येवले यांना रोख सहा लाख रुपये असे एकूण २६ लाख रुपये फिर्यादींनी दिले होते. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पारखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.