नाशिक हादरले! खंडणीच्या तक्रारीतून ‘सेक्स स्कँडल’चा पर्दाफाश; १२१ अश्लील व्हिडिओ उघड, फिर्यादीलाच बेड्या

bpcauthor
2 Min Read

नाशिक (सातपूर): सातपूरमधील एका कथित खंडणी प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले असून, ज्याने तक्रार केली तोच ‘भक्षक’ असल्याचे समोर आले आहे. ६३ वर्षीय फिर्यादी वृद्धच एका मोठ्या सेक्स स्कँडलचा सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, त्याच्यावर लैंगिक शोषण, ॲट्रोसिटी आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

तपासात काय आढळले?

२ एप्रिल रोजी दाखल झालेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड तपासले असता पोलीसही चक्रावून गेले. त्यामध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या. धक्कादायक म्हणजे या सर्व व्हिडिओंमध्ये खंडणी प्रकरणातील फिर्यादी वृद्ध विविध महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आला.

सरकारी नोकरीचे आमिष आणि शोषण

या प्रकरणातील एका पीडित महिलेने धाडसाने पुढे येत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. संशयित रविंद्र गणपत एरंडे (वय ६३) याने पीडितेच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवले. पीडिता अनुसूचित जातीची आहे हे माहित असूनही, तिचा विश्वास संपादन करून तिला नाशिक आणि इगतपुरीमधील विविध हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मोठ्या रॅकेटची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एरंडे याने अनेक महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हिडिओ चित्रित केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांवरून हे एखादे मोठे सेक्स रॅकेट किंवा स्कँडल असण्याची दाट शक्यता आहे.

पोलिसांचे आवाहन: तुमची ओळख गोपनीय राहील

या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, जर इतर कोणत्याही महिला या नराधमाच्या त्रासाला बळी पडल्या असतील, तर त्यांनी न घाबरता सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

संपर्क अधिकारी:

सचिन बारी (सहा. पोलीस आयुक्त): 9049872822

प्रकाश अहिरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक): 9823234176

स्वप्नाली पलांडे (पोलीस निरीक्षक): 7774002710

तपासाची स्थिती:
सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. “तक्रारदारच आरोपी” निघाल्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Share This Article