पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार जाहीर

0
5

ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर , सेवाभावी समाजसेवी श्री एम ए हुसेन आणि शिक्षणक्षेत्रातील समर्पित व्यक्तीमत्व डॉ मनोज देवळेकर हे पुरस्काराचे मानकरी

दि.२९(पीसीबी)-येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त आणि अहिंसा पुरस्कार, अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा आणि भक्ती संध्या अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन महावीर जयंतीच्या दिवशी दिनांक 31 मार्च रोजी करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून महासंघाच्या वतीने शाकाहारी व्यक्ती ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींना हा अहिंसा पुरस्कार दिला जातो‌.

आजपर्यंत अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, डॉ श्रीपाल सबनीस, डॉ रामचंद्र देखणे ,बाबासाहेब पुरंदरे, उल्हास दादा पवार, शेखर गायकवाड , गुरु गोविंद गिरी महाराज या व अशा अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यावर्षी महासंघाच्या निवड समितीने ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले आहे, त्यांना अध्यात्मिक क्षेत्रातील तसेच वास्तु तज्ञ श्री आनंद पिंपळकर यांना वास्तु शास्र व समाजसेवा क्षेत्रातील, ,ज्ञान प्रबोधिनीचे केंद्र संचालक डॉ मनोज देवळेकर यांना शिक्षण क्षेत्रातील तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांची माता पिता मानून सेवा करणार्या श्री हुसेन एम ए यांना मानव सेवा क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार जाहीर झाला आहे .अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख ,महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया माजी अध्यक्ष अजित पाटील ,नितीन बेदमुथा ,उमेश पाटील, विलासकुमार पगारिया व विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया या समिती सदस्यांनी दिली आहे.