दि.२५(पीसीबी)-नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातसंदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच आता राज्य सरकारही या भोंदू बाबावर प्रसन्न झालं होतं असा तपशील समोर आला आहे. विशेष म्हणजे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि फूट पडण्याआधीची शिवसेना सत्तेत असताना या भोंदू बाबाच्या मंदिरासाठी सरकारने निधी दिला होता. यासंदर्भातील कागदपत्रं समोर आली आहेत.
कोणत्या मंत्र्याच्या आदेशाने देण्यात आला हा निधी?
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारने ही मेहरबानी केली होती. या निधीसंदर्भातील 2018 चा शासन आदेश म्हणजेच जीआरची प्रत समोर आली आहे. हा जीआर 31 मार्च 2018 रोजी काढण्यात आल्याचं त्यावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा सरकारच्या तिजोरीतील दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. जनतेच्या हक्काचा पैसा या मंदिराच्या कामासाठी देण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
या पैशांमधून मंदिरात काय काम केलं?
या दीड कोटींमधून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ईशान्येश्वर मंदिराचे काम पूर्ण केलं होतं. मंदिरातील सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लँडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे. ही माहिती समोर आल्याने आता या विषयावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारी अधिकारीही अडचणीत
खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत येत असल्याचंही समोर आलं आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पहिली बदली करण्यात आली आहे. अभिजित भांडे पाटील यांची झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. खरातसोबत अभिजित भांडे पाटील यांनी पत्नीच्या नावाने गुंतवणूक केली होती. हीच गुंतवणूक आता अभिजित भांडे पाटलांना भोवली आहे.
खरातचा सीए सापडला
खरातचे आर्थिक व्यवहार संभाळणारा सीए पुण्यातला असल्याची माहितीही समोर आली आहे. ललित पोफळे असे खरातचे अर्थिक व्यवहार संभाळणार्या सीएचे नाव आहे. सीए ललित पोफळे खरातच्या ट्रस्टवर पाच वर्षे ट्रस्टी होता. सीए ललित पोफळे आणि खरातचे अर्थिक व्यवहार असल्याचं समोर आलं असून या दोघांनी एकमेकांच्या खात्यावर पैशांची देवाणघेवाण केली आहे. खरातची सर्व आर्थिक कुंडली सीए ललित पोफळेकडे आहे. सीए ललित पोफळे खरातच्या पैशांची करायचा गुंतवणूक. खरातच्या पैशातुन पोफळेने पुणे, नोयडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये अनेक प्रॅापर्टी घेतल्या आहेत. खरात हा ललित पोफळेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या काळ्या पैशांची गुंतवणूक करायचा. सीए ललित पोफळेने देशातील एका बड्या बाबाच्या कंपनीचा आयपीओ आणण्यात मदत केली होती. त्याच धर्तीवर पोफळे हा खरातची कंपनी स्थापन करुन त्याचाही आयपीओ आणण्याचा तयारीत होता.







































