‘चला चिऊ वाचवू अभियान’: एक व्यापक जनसहभाग

0
4

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि कल्पकघर आयसर पुणेच्या सहयोगाने पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट’ आयोजित ‘चला चिऊ वाचवू अभियान’ अंतर्गत विविध चिमणी स्पर्धांचा चिमणी पुरस्कार वितरण सोहळा जागतिक चिमणी दिनानिमित्त पार पडला. अभियानाचे हे ११ वे वर्ष आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शहरीकरणामुळे कमी होत चाललेल्या चिमण्यांचे संवर्धन, त्यांचे महत्त्व समाजासमोर मांडणे आणि जनसामान्यांसह विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणे हा आहे.

या अभियाना अंतर्गत स्चिमणी चित्रकला, चिमणी रांगोळी, चिमणी कथा आणि चिमणी कविता स्पर्धा चार भाषेत (मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी) घेण्यात आल्या होत्या. अभियानाला भौगोलिक सीमा ओलांडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी प्रमाणे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारत आणि जागतिक स्तरावरून देखील नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे.

महाराष्ट्र: पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि बीड या जिल्ह्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भारत (इतर राज्ये): गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम, गोवा आणि केरळ या राज्यांतूनही प्रवेशिका प्राप्त झाल्या, त्यामुळे अभियान खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

        जागतिक सहभाग: सातासमुद्रापार कॅनडा मधूनही पक्षी प्रेमींनी या मोहिमेत सहभाग नोंदवून या विषयाचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले आहे.

        या अभियानात वय वर्षे ४ वर्षांच्या बालकांपासून ते ८४ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंतच्या चिऊप्रेमींनी आपल्या विविध कलांद्वारे उल्लेखनीय सहभाग नोंदवला. आबालवृद्धांचा हा सहभाग दर्शवतो की, 'चला चिऊ वाचवू अभियान' आता एका लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे.

        सर्व वयोगटासाठी चिमणी चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना ‘श्रावण कांबळे चित्रकला पुरस्कार’, वय वर्षे 12 च्या पुढील वयोगटासाठी चिमणी रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना ‘गिरिश वाघेला रांगोळी पुरस्कार’, वय वर्षे 18च्या पुढील वयोगटासाठी चिमणी कथा स्पर्धेच्या विजेत्यांना ‘राष्ट्रीय कीर्तनकार ओतूरकर बुवा कथा पुरस्कार’ आणि वय वर्षे 18च्या पुढील वयोगटासाठी चिमणी कविता स्पर्धेच्या विजेत्यांना ‘विजयाबेन वाघेला काव्य पुरस्कार’ प्रदान करुन गौरवविण्यात आले. आकुर्डीच्या पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ प्रायमरी शाळेने ने सर्वाधिक सहभाग नोंदवणारी शाळा म्हणून पारितोषिक जिंकले.

        चिमणी पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते भूगोलतज्ज्ञ व पक्षी अभ्यासक मा. श्री. पीयूष सेकसरिया यांचे ‘पक्षी खिडक्यांवर का धडकतात?’ या विषयी अभ्यासपूर्ण व्याखान झाले. पीयूष सेकसरिया म्हणाले, “चला चिऊ वाचवू अभियानातर्गत आयोजित विविध चिमणी स्पर्धेत सहभागींनी चित्रकला, कथा, कविता आणि रांगोळी कलाप्रकारांच्या माध्यमातून चिमण्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून, लुप्त होत चाललेल्या जैवविविधतेबद्दलची एक साद आहे. व्यापक जनसहभागानेच चिमणी संवर्धन शक्य होईल”

        या चिमणी पुरस्कार सोहळ्या दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया आणि अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वानंद केसरी आणि चैतन्य राजर्षी यांनी केले. अलाईव्हचे विश्वस्त राजेंद्र कांबळे आणि डॉ. भालचंद्र पुजारी यांनी संयोजन केले व आभार मानले.