दि.२४(पीसीबी)-ओला ॲपद्वारे बुक केलेल्या रिक्षाचे जादा भाडे मागितल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने प्रवाशाला आणि त्यांच्या कुटुंबाला लाकडी फळीने मारहाण केली. तसेच सुनेला ढकलून देत तेथून पलायन केले. ही घटना १५ मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास वल्लभनगर, पिंपरी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे घडली.
सुभाष छबुलाल अमृतकर (६९, वल्लभ नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच १४/एलएस ०४५७) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि सून ऍप आधारित रिक्षाने आपल्या घरी पोहोचले. तिथे रिक्षाचालकाने ॲपवरील भाड्यापेक्षा जादा पैसे मागितले. फिर्यादीच्या मुलाने जाब विचारला असता, चालकाने रिक्षातील लाकडी फळी काढून मुलाच्या डोक्यात आणि फिर्यादीच्या छातीवर मारली. तसेच फिर्यादीच्या नाकावर बुक्की मारून त्यांना जखमी केले. पती आणि सासरे यांना वाचविण्यासाठी आलेल्या त्यांच्या सुनेला ढकलून देऊन आरोपी पसार झाला. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.







































