दि.२४(पीसीबी)-भोंदू बाबा अशोक खरात हा सरकार पुरस्कृत बाबा होता की काय याची खात्री पटावी अशी परिस्थिती सध्या आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खरातने मंदिरासाठी रस्त्याची मागणी केली आणि ती पूर्ण देखील झाली.मंत्रिमंडळ उप समितीने पाणी दिले, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पदावर असताना आणि त्याचे “गुण” माहीत असूनही त्याचे उदात्तीकरण केलं,त्याची दुष्कृत्ये माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले,त्याच्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील याची काळजी घेतली.महसूल विभागाने जमीन विषयक कायद्याकडे दुर्लक्ष केले.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर कहर केला, अशोक खरातला अस्ट्रॉनॉमीचं चांगलं ज्ञान असल्याने आपण त्याच्याकडे ज्योतिष बघण्यासाठी जात होतो असं त्यांचं म्हणणं आहे.ज्या शिक्षण मंत्र्याला अस्ट्रॉनॉमी आणि अस्ट्रॉलॉजी यांच्यातला फरक कळत नाही त्यांच्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार?.
खरातशी अनेक अधिकाऱ्यांनी आर्थिक संबंध ठेवलेले आहेत.त्यातील एक अधिकारी अभिजीत भांडे पाटील याचे खरात बरोबरचे संबंध पुढे आले.या अभिजीत भांडे पाटलावर शेकडो कोटी रुपयांची काळीमाया जमा केल्याचा आरोप आहे आणि त्यासंदर्भात २०२४ मध्ये विधानसभेत लक्षवेधी देखील मांडण्यात आली होती. परंतु पुढे काहीच झालं नाही,अर्थात ते होणारच नव्हतं.
भोंदू खरात आणि त्याच्या चरणी लोळण घेणारे मंत्री आणि अधिकारी पाठीशी असल्यावर काय होणार? असे अनेक अधिकारी आणि मंत्री भोंदू बाबाच्या चरणी लोळण घेत होते.अनेक आयएएस अधिकारीही त्याच्या सेवेत होते.







































