पिंपरीत क्रांतिकारक हेमू कलानी यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी

1 Min Read

दि.२३(पिसीबी): पिंपरी येथील हेमू कलानी उद्यानात आज सकाळी आठ वाजता सिंधी समाजातील थोर क्रांतिकारक हेमू कलानी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय सिंधू सभा, पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शाखाध्यक्ष मनोहर जेठवानी यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे लवकरच निवेदन देऊन हेमू कलानी यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सिंधी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचाही संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेमू कलानी यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सख्खर येथे झाला. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेत ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. ब्रिटिश अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न करताना त्यांना अटक झाली आणि ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. फासावर जाताना त्यांनी निर्भयपणे मृत्यूला सामोरे जात स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा दिली.

या कार्यक्रमास सिंधी समाजातील अनेक मान्यवर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला असून शेवटी उपस्थितांनी क्रांतिकारक हेमू कलानी यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share This Article