नाशिकचा भोंदू ‘कॅप्टन’, अंधश्रद्धा, अधिकचा हव्यास आणि सामाजिक मानसिकता

0
3

दि.२२(पीसीबी)-‘कॅप्टन’ या नावाच्या एका तथाकथित ज्योतिष्याला नाशिक पोलिसांनी अटक केली. दैवी शक्ती आणि कर्मकांडांच्या नावाखाली त्याने एका महिलेचे वर्षानुवर्षे शोषण केल्याचा गंभीर आरोप या कॅप्टनवर आहे. या प्रकरणाचे काही अश्लीलव्हिडीओ विविध समाजमाध्यमांतून झळकले. पोलीस तपासात अशा प्रकारचे अजून ५०-१०० व्हिडीओ जप्त झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला व पुरोगामी महाराष्ट्रात तीव्र संताप पसरला. राजकीय व्यक्तींसोबतच प्रशासकीय सेवेतील व उच्चभ्रू समाजातील अनेक जणांची या भोंदू बाबाशी जवळीक असल्याने या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे.

सुशिक्षित व सुस्थितीत असलेल्या व्यक्ती अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात कशा अडकल्या? याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेकडे केवळ एक गुन्हेगारी प्रकार म्हणून बघून चालणार नाही; तर अशा घटना वारंवार का घडतात, याचा मुळाशी जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील बदलती मानसिकता आणि आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन या घटनांना खतपाणी घालत आहेत का? याबद्दल विवेचन होणे आवश्यक आहे.

शोषणाची ही समस्या नवी नाही. भारतातीलच नव्हे, तर जगभरामध्ये शोषणाचे असे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. कोणताही काळ किंवा समाज यापासून सुरक्षित राहिलेला नाही. शतकानुशतके विविध संस्कृतींमध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणे, हे मानवाच्या मानसिक स्थितीबद्दल एक कटू सत्य प्रकट करते. मनातील अस्वस्थता जेव्हा विचारांवर ताबा मिळवते, तेव्हा एखादा मोठा राजकारणी असो, अधिकारी असो, गृहिणी असो, श्रीमंत असो, गरीब असो किंवा सुशिक्षित/अशिक्षित असो; सगळेच आपली विवेकबुद्धी गमावून बसतात. फसवणाऱ्यांचे चेहरे बदलतात; मग कोणी दैवी उपचार करणारा असतो, तर कोणी धार्मिक गुरूची झूल पांघरतो, अथवा कोणी तत्त्वज्ञान सांगणाऱ्याचा वेश धारण करतो आणि मानवाच्या मनातील दुःख वा लोभ ओळखून त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर ताबा मिळवतो. मग श्रद्धेच्या नावाखाली त्याचे विविध पद्धतीने शोषण सुरू होते.

समाजामध्ये ‘आयुष्य म्हणजे केवळ सुखाचा प्रवास आहे’ असा गैरसमज दुर्दैवाने खोलवर रुजला आहे. परंतु वास्तवात आयुष्य हे सुख-दुःख, यश-अपयश आणि खात्री-शंका यांचे एक अनाकलनीय मिश्रण आहे. मात्र युगांयुगे हे साधे वास्तव स्वीकारणे आपल्याला जमलेले नाही, ही खरी शोकांतिका आहे! कसलीच शाश्वती नसलेल्या जगात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी सुख हवे असते.

सुख आणि दुःख हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. मात्र ज्या वेळी आपण एखाद्या नात्यात अयशस्वी होतो, आर्थिक संकटात सापडतो अथवा जीवनातल्या संघर्षांपासून पळ काढतो, तेव्हा काहीतरी दैवी घडविण्याचा आपला प्रवास सुरू होतो. नातेसंबंध असो अथवा पैसा असो, आपल्या आयुष्यात जे आहे ते गमवण्याची भीती एकदा मनात निर्माण झाली की आपली तर्कबुद्धी नष्ट होते. जेव्हा जेव्हा आंतरिक वेदना आणि सहज सुटकेची इच्छा यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा तेव्हा ‘काहीतरी अलौकिक घडून आपली सुटका तात्काळ व्हावी’ ही भावना मनात व्यापते. जीवनात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याच्या नादात झटपट उपाय/चमत्कार करण्याचा आणि आपले नशीब बदलण्याचा दावा करणाऱ्या भामट्यांकडे अनेक जण विनासायास आकर्षित होतात आणि मानसिक, आर्थिक व शारीरिक शोषणाला बळी पडतात.

आपल्याकडे पैसा, पद, प्रतिष्ठा किंवा आरोग्य कितीही असले, तरी ‘अजून थोडे जास्त हवे’ ही लालसा आपल्याला शांत बसू देत नाही. माणसाच्या मनात वरवर शांतता दिसत असली, तरी आतून काहीतरी कमी असल्याची किंवा सर्व काही असतानाही भविष्याची एक ‘लपलेली काळजी’ आपल्या मनात कायम असते. आपण सर्वच एका अत्यंत सुप्त अस्वस्थतेत जगतो. मानवी जीवनाचा इतिहास पाहिला तर ‘अजून थोडे जास्त हवे’च्या शोधात मानवी जीवनाची प्रगती निश्चितपणे झालेली आहे. नैतिक मार्गाने बाळगलेल्या महत्त्वाकांक्षेमुळे मनुष्य स्वतःचा विकास साधतोच, परंतु त्यासोबत समाजाच्या प्रगतीलाही हातभार लावतो. मात्र, ही ‘जास्त’ मिळवण्याची ओढ जोपर्यंत नीतिमत्तेच्या चौकटीत असते, तोपर्यंतच ती मानवासाठी वरदान ठरते. अन्यथा, विनाकारण हव्यास हा विनाशाकडे नेणारा मार्ग ठरतो! नीतिमत्तेच्या मार्गापासून भटकत “अधिक”च्या शोधातच अनेक जण भोंदू बाबांच्या जाळ्यात अगदी अलगदपणे अडकतात.

नाशिकच्या प्रकरणातून खऱ्या अर्थाने धडा घेताना समाजाने केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, तर अशा घटना का घडतात याच्या मूळ कारणाबाबत अंतर्मुख होण्याची नितांत गरज आहे. कोणताही धर्म हा नीतिमत्तेने जीवन जगण्याचाच संदेश देत असतो. मात्र धर्म आणि श्रद्धेचा दुरुपयोग करून जेव्हा एखाद्याचे शोषण होते, तेव्हा ती श्रद्धा नसून अंधश्रद्धा ठरते. जोपर्यंत आपण आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी किंवा सुखाच्या हव्यासापोटी चमत्कारांच्या मागे धावणे थांबवत नाही, तोपर्यंत समाजाच्या दुबळ्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्याचे शोषण होत राहणार..

मानवी जीवन हा संघर्षाचा प्रवास असून सुख-दुःख हे या प्रवासाचे कायम सोबती आहेत, हे सत्य स्वीकारायला शिकले पाहिजे. संकटांपासून पळ न काढता धैर्याने त्यांचा सदसद्विवेकबुद्धीने सामना करणे हाच योग्य व एकमेव मार्ग आहे. आपल्याकडे आहे त्यापेक्षा “अजून थोडे जास्त हवे” ही इच्छा पूर्ण करताना नीतिमत्तेच्या चौकटीचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाने देखील यश आणि सुखाची व्याख्या नव्याने करणे आवश्यक आहे अन्यथा असे बाजारू ‘कॅप्टन’ वारंवार निर्माण होतच राहतील.