दि.२२(पीसीबी)-नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गंभीर व गुंतागुंतीचा होत चालला आहे. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, तपास पुढे सरकत असताना नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.SITने अशोक खरात आणि त्याचा निकटवर्तीय समजला जाणारा ऑफिसबॉय नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. या चौकशीदरम्यान दोघांमध्ये पोलिसांसमोरच तीव्र शाब्दिक वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माहिती लपवण्याच्या मुद्द्यावरून ही खडाजंगी झाली असून काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
तपासादरम्यान नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात आला असता, त्यात तब्बल ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक आढळून आले आहेत. या महिलांशी जाधव सतत संपर्कात होता, अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरज जाधवच महिलांना अशोक खरातकडे ‘सल्ला’ किंवा ‘समस्या निवारण’च्या नावाखाली पाठवत होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जाधवची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, तो या जाळ्याचा प्रमुख दुवा किंवा ‘मास्टरमाईंड’ असण्याची शक्यता तपासली जात आहे.
फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना जाधवने येणाऱ्या महिलांशी संपर्क वाढवला आणि त्यातून हे नेटवर्क उभे राहिले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. CDRमधील माहितीच्या आधारे SIT आता त्या महिलांशी संपर्क साधून अधिक माहिती गोळा करत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अशोक खरातची शनिवारी तब्बल सात तास कसून चौकशी करण्यात आली. रविवारी देखील हिमांशू पोलीस क्लब येथे SIT अधिकारी पुन्हा चौकशीसाठी दाखल झाले असून, खरातची पुन्हा चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील प्रत्येक दुव्याची बारकाईने तपासणी करत आहे.
या प्रकरणाला आता आर्थिक गैरव्यवहारांचा देखील रंग चढला आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) या तपासात एन्ट्री घेतली असून, खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाचे स्त्रोत यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचे आयकर विवरणपत्र, देणगीदार, व्यावसायिक भागीदार आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व व्यक्ती आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या नावावर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर शिर्डी, सिन्नर आणि इतर भागात कोट्यवधींच्या मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या आर्थिक जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ एका ‘भोंदू बाबा’पुरते मर्यादित न राहता, महिलांची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, प्रभावशाली संपर्क आणि संभाव्य मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहे. SIT आणि आयकर विभागाच्या संयुक्त तपासातून या प्रकरणातील आणखी धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









































